मुंबई - विधानसभा निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचलेला असला तरी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अंतिम स्वरुपात जागावाटप झालेले नाही. अनेक पक्षांनी आपली पहिली यादी जाहीर केलीय. दरम्यान, शिवसेनेनं आपली 45 जणांची पहिली यादी मंगळवारी रात्री जाहीर केलीय. मात्र अद्यापपर्यंत वरळी विधानसभा मतदारसंघातून कुणालाही उमेदवारी दिली नाहीये. तर इथे शिवसेना (ठाकरे गटाकडून) आदित्य ठाकरे तर मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र महायुतीतून अद्याप कोणालाही उमेदवारी देण्यात आली नसल्यामुळं आदित्य ठाकरे या तुल्यबळ उमेदवाराच्या विरोधात नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मात्र शिवसेना चित्रपट सेनेचे सचिव आणि अभिनेता सुशांत शेलार यांनीही वरळीतून निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक असल्याचं म्हटलंय.
वरळीचा कायापालट करणार:दरम्यान, ईटीव्ही भारतशी संवाद साधताना अभिनेते आणि शिवसेना चित्रपट सेनेचे सचिव सुशांत शेलार म्हणाले की, वरळीत अनेक दिवसांपासून विविध प्रश्न 'आ' वासून प्रलंबित आहेत. यामध्ये वरळी पुनर्वसन असो, कोळीवाडा, चाळीचे प्रश्न असो, असे अनेक प्रश्न आहेत. मात्र इथले स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नावामध्ये फक्त मोठेपण आहे. पण काम मात्र काहीच नाही. आदित्य ठाकरे हे मागील पाच वर्षांपासून येथे आमदार आहेत. मात्र कुठल्याही प्रश्नावर त्यांनी तोडगा काढलेला नाही. त्यामुळेच त्यांच्याविषयी मतदारांमध्ये उदासीनता आहे. माझ्या नावात जरी ठाकरे नसले तरी जर पक्षाने मला उमेदवारीची जबाबदारी दिली, तर मी नक्कीच इथून निवडणूक लढवेन. जर निवडून आलो तर वरळीचा नक्कीच कायापालट करेन, असा विश्वास यावेळी अभिनेता सुशांत शेलार यांनी व्यक्त केलाय.