मुंबई - A stolen mobile phone : मोबाईल फोन हरवणं किंवा चोरीला जाणं अशा बातम्या आपल्यासाठी काही नवीन नाहीत. हा प्रकार कधी तरी आपल्याबरोबर किंवा आपल्या नजिकच्या लोकांबरोबरही घडलेला असू शकतो. त्यामुळे पोलिसात तक्रार केल्यानंतर तो परत मिळतो का? याबद्दलची उत्सुकता आपल्याला असते. अशीच मोबाईल चोरीची एक तक्रार जुहू पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र यांच्या ड्रेस डिझाईनरचा मोबाईल फोन चोरीला गेला आहे. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 379 अन्वये आज गुन्हा दाखल करण्यात आला.
विलेपार्ले परिसरात राहणारा आणि सिने अभिनेता जितेंद्र यांच्याकडे ड्रेस डिझायनर म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद अश्फाकुल मंजूर आलम (वय 42) यांचा मोबाईल फोन चोरट्याने चोरून नेला आहे. आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत अशी माहिती जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली आहे. मोहम्मद मंजूर आलम हा तक्रारदार गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विलेपार्ले येथे राहण्यास असून तो ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र यांच्याकडे ड्रेस डिझायनर म्हणून काम करतात. आलम हे आयफोन 13 हा मोबाईल फोन वापरत होते. 23 जून रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास जुहू येथून आपल्या राहत्या घरी पायी चालत जात होते. त्यावेळी मोहम्मद अलाम यांनी त्यांचा मोबाईल फोन पाठीवर अडकवलेल्या सॅकच्या वरील कप्प्यामध्ये ठेवून बॅगेची चेन लावलेली होती.
साधारण पावणे बारा वाजताच्या सुमारास चिऊ येथील कल्पना बिल्डिंग समोर असताना मोहम्मद आलम यांनी घरी फोन लावण्यासाठी सॅक मधून मोबाईल काढण्यासाठी सॅक पुढे घेतली असता सॅगची चैन उघडी असल्याचे दिसले. त्यानंतर आलम यांनी सॅक मध्ये आयफोन मोबाईल शोधला असता त्यांना मोबाईल फोन सापडला नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात चोरट्याने तक्रारदार आलम पायी चालत असताना त्यांच्या पाठीवर अडकवलेल्या सॅकची चेन उघडून मोबाईल लंपास केल्याचे निष्पन्न झाल्यानं मोहम्मद आलम यांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारदार मोहम्मद मंजूर आलम यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अनुश्री भार्मगोंडा या करत असल्याची माहिती मिळाली आहे. आता प्रश्न आहे तो हा मोबाईल सापडणार का? याचा. चोर सापडला तर काही रंजक गोष्टी कळू शकतील, त्याची आपण तक्रारदारप्रमाणे प्रतीक्षा करुयात.