पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. वेगवेगळ्या पक्षांनी, उमेदवारांनी राज्यभर जोरदार प्रचार सुरू केला आहे. तसंच राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. येत्या 20 तारखेला मतदान आणि 23 तारखेला निकाल लागणार आहे. असं असताना मतदार कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन कोणाला सत्ता देणार हे येत्या 23 तारखेलाच कळणार आहे.
पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले :निवडणुकीच्या या रणधुमाळीत सर्वच पक्षाला मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करावा लागतो. यासाठी पक्षाचे झेंडे, शाल, टोपी, बॅच, बिल्ले हे साहित्य कार्यकर्त्यांना लागतं. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडं हे साहित्य गेल्या अनेक दशकांपासून बनवलं जात असून ते प्रसिद्ध देखील आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांकडून मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडं झेंडे तसंच विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे.
प्रतिक्रिया देताना मुरुडकर झेंडेवाले (ETV Bharat Reporter)
शाही पगडीला जास्त मागणी: याबाबत मुरुडकर झेंडेवाले म्हणाले, "सध्या झेंडे, उपरणे, टोप्या, बॅचेस आणि विविध पक्षाचे चिन्ह यांना गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. ज्या उमेदवारांना ज्या ज्या पक्षाची उमेदवारी मिळाली आहे ते त्या त्या पक्षाचं साहित्य खरेदी करत आहेत. या निवडणुकीत विशेष बाब सांगायची तर पक्षाचे चिन्ह, शाही उपरणे, विविध स्वरूपातील पगडीला मागणी आहे".
पक्षाकडून 'या' साहित्याची जास्त खरेदी :यंदाच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला जे नवीन चिन्ह मिळालं आहे ते 'तुतारी वाजविणारा माणूस'. सध्या ही तुतारी मोठ्या प्रमाणात लोक खरेदी करत आहेत. तर भाजपाकडून टोप्या मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जात आहेत. काँग्रेसकडून उपरणे खरेदी केली जात आहेत. तसंच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या लोकांनी मशाल मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. सहसा मशाल ही शिवजयंतीमध्ये खरेदी होत असते पण आत्ता या निवडणुकीत मशाल खरेदी होताना पाहायला मिळत असल्याचं मुरुडकर यांनी सांगितलं.
सोशल मीडियामुळं व्यवसायावर परिणाम: सध्या मोठ्या प्रमाणात डिजिटलचा वापर करून उमेदवारांकडून प्रचार होताना पाहायला मिळत आहे. मात्र, अशातच झेंडे तसंच विविध साहित्य खरेदीवर नेमका काय परिणाम झाला? याबाबत मुरुडकर म्हणाले, "नक्कीच डिजिटल प्रचारामुळं प्रत्यक्ष वस्तू खरेदी कमी झाली आहे. पूर्वी जे मोठ्या प्रमाणावर झेंडे, टोप्या खरेदी केल्या जायचे ते आत्ता खरेदी होत नाही. परंतु रॅली आणि प्रचार सभा सुरू असून यासाठी आजही मोठ्या प्रमाणावर नाही पण कमी प्रमाणात विविध साहित्य खरेदी केलं जात आहे. तसंच महागाईचा फटका देखील बसला आहे. त्यामुळं रॉ मटेरियलचे दर 20 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत. पण सोशल मीडियामुळं व्यवसाय कमी झाल्यानं जाणूनबुजून जुनेच दर लावण्यात आले आहेत."
फोल्डिंगवाली तुतारी बाजारात :राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह दिलं. यंदाच्या या निवडणुकीत मुरुडकर झेंडेवाले यांनी फोल्डिंगवाली तुतारी बाजारात आणली. ही तुतारी फोल्ड देखील होते.
हेही वाचा -
- अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घोषणापत्र प्रसिद्ध, 'लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवणार;' अजित पवारांचं आश्वासन
- "गद्दारीसाठी पंधरा खोके आणि लाडकी बहीण पंधराशेत ओके"- खासदार अमोल कोल्हेंचा महायुतीवर हल्लाबोल
- "20 तारखेला बकरीला कापू," सुनील राऊतांचं वादग्रस्त विधान; आक्षेपार्ह विधानांमुळे विरोधक वारंवार अडचणीत, नेमकी कारणं काय?