पुणे : Accused Absconded from Sassoon: कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाल्याची घटना घडली आहे. मार्शल लीलाकर असं पळून गेलेल्या आरोपीच नाव आहे. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी लीलाकारला अटक केलं होत. गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर मेडिकल तपासणीसाठी लीलाकरला ससून रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी आणण्यात आलं होत. मात्र, तो यावेळी पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला. या घटनेनंतर त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस विभागाचे अथक प्रयत्न सुरू आहेत.
सोळा जणांना अटक : कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची काही दिवसांपूर्वी पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच्याच साथीदार असलेल्या मुन्ना पुळेकर याने ही हत्या केली आहे. त्यानंतर पुण्यात मोठा गॅंगवर सुरू होणार अशी भीती निर्माण झाली. या हत्येप्रकरणी विठ्ठल शेलार किशोर मारणे यांना अटक करण्यात आली. यांच्यासोबत पंधरा ते सोळा जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर सध्या पुण्यात दहशतीचं वातावरण पसरलेल आहे.
गुन्हे शाखेने त्यांना अटक केली होती : शरद मोहोळ यांची हत्या झाल्यानंतर त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकी येत असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती. स्वाती मोहळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येतं होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्या अनुषंगाने आकुर्डी येथे राहत असलेल्या मार्शल लीलाकर यांनी सोशल मीडियावरून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे शाखेने त्यांना अटक केली होती. त्यानंतर आज त्याची मेडिकल तपासणी करण्यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात आणण्यात आलं. त्यावेळी तो पोलिसांना चकवा देत पळून गेला.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न ? : काही दिवसांपूर्वी ड्रग्स प्रकरणातील आरोपी असलेला ललित पाटीलसुद्धा ससून रुग्णालयातूनच पळून गेला होता. त्यामुळे ससूनमध्ये आल्यानंतर पुणे पोलीस सतर्क का राहत नाहीत? असा प्रश्न आता सर्वांनी विचारायला सुरूवात केली आहे. पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणारा हा सगळा प्रकार असल्याचही आता बोललं जात आहे.