ठाणे Minor Kidnapped and Killed :१३ वर्षाच्या मुलानं रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी चालकाला हात दाखवत बाजारापर्यत सोडण्याची विनंती केली. मात्र, त्या मुलाच्या हातात स्मार्ट मोबाईल फोन बघताच दुचाकी चालकाची नियत फिरली. त्या मुलाला लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसवत त्याचं अपहरण केलं. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन त्याच्याकडील मोबाईल आणि १०० रुपये रोख हिसकावून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
आरोपी अटकेत : ही घटना भिवंडी तालुक्यातील पाच्छापूर गावानजीक असलेल्या हर्याचापाडा परिसरात घडली. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात अपहरण, हत्या आणि पुरवा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना शिताफीनं अटक केली. नितीन वाघे (वय ४०), पद्माकर भोईर (वय, २०) आणि अजय मांजे ( वय २१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून हे तिघेही भिवंडी तालुक्यातील पडघानजीक असलेल्या चावा गावचे रहिवासी आहेत.
पैसे आणि मोबाईलसाठी हत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अल्पवयीन मुलगा हा भिवंडी तालुक्यातील हर्याचापाडा येथे राहत होता. तो शहापूर तालुक्यातील एका आश्रम शाळेत ९ विच्या वर्गात शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झाल्यानं आईनं दुसरा विवाह केल्यानं त्याला आश्रम शाळेत शिक्षणासाठी ठेवलं होतं. काही महिन्यापूर्वीच त्याच्या आईनं त्याला रेडमी कंपनीचा १५ हजाराचा स्मार्ट फोन घेऊन दिला होता. त्यातच रक्षा बंधनाचा सण साजरा करण्यासाठी तो आश्रम शाळेतून हर्याचापाडा येथे आपल्या काकाकडं आला होता.
अपहरण करुन हत्या : रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी म्हणजे १८ ऑगस्टला पाच्छापूर येथील बाजारात राखी आणि काही साहित्य खरेदीसाठी त्याच्या काकानं मृत मुलाला १०० रुपये दिले होते. मृत मुलगा त्या दिवशी सकाळी ९ वाजल्याच्या सुमारास राखी खरेदीसाठी घरातून निघाला होता. त्यानंतर राखी खरेदीसाठी १८ ऑगस्ट रोजी घरून गेलेला मुलगा त्या दिवशी परत आला नव्हता. शिवाय रक्षाबंधनच्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी तो आला नसल्याचं पाहून काकाला वाटले की, मुलगा आश्रम शाळेत परत गेला असावा, त्यामुळं काकानं शाळेच्या अधिकाऱ्यांकडं चौकशी केली असता, त्यांनी तो परतला नसल्याचं सांगितलं.