ठाणे Married Woman Suicide :कल्याण पूर्वेतील आडिवली-ढोकळी येथे राहणाऱ्या जागृती बारी यांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. तुझे ओठ काळे आहेत, तोंडाला घाणेरडा वास येतो, असं पतीसह तिला सासू-सासरे टोमणे मारत होते. त्यामुळं लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जागृतीनं जीवनयात्रा संपवलीय. विशेष म्हणजे मृत्यूपूर्वी 24 वर्षीय जागृतीनं तिच्या मोबाईलवर एक चिठ्ठी लिहून सासू, पतीला जबाबदार धरलंय. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सागर रामलाल बारी असं अटक केलेल्या पतीचं नाव आहे. शोभा रामलाल बारी असं अटक करण्यात आलेल्या सासूचं नाव आहे.
10 लाख रुपये देण्याची मागणी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गजानन भिका वराडे यांनी आपली मुलगी जागृतीचा विवाह जळगावमधील पिंप्राळामधील सागर रामलाल बारीसोबत दोन महिन्यांपूर्वी लावून दिला. लग्नात सागरला 14 ग्रॅमची सोन्याची चेन, 6 ग्रॅमची सोन्याची अंगठी देण्यात आल्याची माहिती मृतकाच्या वडिलांनी दिली. दुसरीकडं सागर मुंबई पोलीसत नोकरीला आहे. विवाहानंतर 21 जूनला कल्याणमधील आडीवली ढोकळी या परिसरामध्ये पतीसह राहायला जाणार असल्यानं तिचं आई-वडील पिंप्राळा गावात भेटायला गेले होते. मृत जागृतीचे आई-वडील भेटायला आले, तेव्हा तिची सासू शोभा रामलाल बारी हिनं हुंडा दिला नाही, अशी तक्रार केली हाती. तसंच मुंबईत घर घेण्यासाठी 10 लाख रुपये द्या, अशी मागणी केल्याचा आरोप वराडे कुटुंबानं केला आहे.
पतीसह सासूविरोधात गुन्हा दाखल : सध्या शेतीमध्ये पैसा गुंतलेला आहे, त्यामुळं पैसे नाहीत. मी तुम्हाला थोडीफार रक्कम देईन, असं आम्ही सांगितलं. त्यानंतर मुलगी मुंबईमध्ये राहायला गेली. असं वराडं कुटुंबानं प्रसारमाध्यांना माहिती दिली. यानंतर मात्र 5 जुलैला जागृतीचा पती सागरनं तिचा भाऊ विशालला फोन केला. तुझ्या बहिणीनं घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतला. असं विशाला सांगितलं. या घटनेमुळं जागृतीचे आई-वडील, काही नातेवाईक कल्याणमध्ये आले. यानंतर मृत जागृतीच्या आईनं पोलिसांकडं तक्रार केली. घर घेण्यासाठी 10 लाखांचा हुंडा मागणं, शारिरिक, मानसिक छळ करत असल्याचा गुन्हा पती सागर बारी, सासू शोभा बारी यांच्यावर दाखल करण्यात आला.