अमरावती Chandrabhanji Vidyalaya Amravati :परिस्थिती हलाखीची, मजुरीच्या भरवशावर कुटुंबाचे पोषण करताना निदान लिहिता वाचता यावं म्हणून मुलांना शाळेत पाठवणाऱ्या ग्रामीण भागातील पालकांची मुलं केवळ लिहायला आणि वाचायलाच शिकली नाही तर विविध खेळाच्या माध्यमातून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील मैदान गाजवायला लागली आहेत. तसेच खेळाच्या भरवशावर त्यांनी सरकारी नोकरीत देखील जागा पटवायला लागली आहे.
8 गावात क्रीडा संस्कृती रुजविणारे विद्यालय : एकूणच गावात क्रीडा संस्कृती रुजविणारे चंद्रभानजी विद्यालय हे अमरावती शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुंड सर्जापूर गावात एक आदर्श ठरले आहे. विशेष म्हणजे पेढी नदीच्या काठावर वसलेल्या कुंड सर्जापुरसह लगतच्या एकूण आठ गावातील विद्यार्थी खेळायला मिळेल म्हणून या शाळेत यायला लागले आहेत.
क्रीडा शिक्षकाच्या मेहनतीचे फळ :कुंड सर्जापूर येथील चंद्रभानजी विद्यालयात 2007 मध्ये राष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटू असणारे, शरद गढीकर हे क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झाले होते. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खेळाची आवड लावण्यासाठी त्यांनी पहिल्या वर्षीपासूनच प्रयत्न सुरू केले. विशेष म्हणजे पहिल्याच वर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्यांनी सॉफ्ट बॉल, बेसबॉल, खो-खो कबड्डी या खेळांचे महिनाभराचे शिबिर शाळेच्या पटांगणात भरवले होते. पहिल्या वर्षीपासूनच या शिबिराला विद्यार्थ्यांनी आनंदाने प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे या उन्हाळी क्रीडा शिबिरासाठी शरद गढीकर हे स्वतःच्या खिशातून खर्च करतात. उन्हाळी क्रीडा शिबिराची परंपरा ही आजपर्यंत या शाळेत कायम आहे. वर्षभर खेळा संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतानाच क्रीडा शिबिराच्या माध्यमातून गावात उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्याचं काम शरद गढीकर हे करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या वतीनं त्यांना जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार बहाल केला आहे.
शाळेत आठ गावातून येतात विद्यार्थी : कुंड सर्जापूर या गावातील चंद्रभानजी विद्यालयात कुंड, कुंड सर्जापूर, कुंड, खुर्द, वनारसी, अडणगाव, हातुर्णा, सातुर्णा आणि सावरखेड या एकूण आठ गावातील विद्यार्थी शिकायला येतात. पेढी धरणामुळं अनेक गावांचे पुनर्वसन होत असल्यामुळं शाळेची पटसंख्या पूर्वीपेक्षा आता बरीच कमी झाली आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत हजार बाराशे विद्यार्थी संख्या असणाऱ्या या शाळेत आता केवळ 200 विद्यार्थी येतात. या 200 पैकी 125 विद्यार्थ्यांनी 2023- 24 मध्ये विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला आहे. यापैकी 50 विद्यार्थ्यांची निवड ही राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे.
सॉफ्ट बॉल, बेसबॉल ही शाळेची ओळख : या शाळेमध्ये शरद गढीकर हे 2007 मध्ये रुजू झाले असताना कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, सॉफ्ट बॉल, बेसबॉल अशा खेळांमध्ये विद्यार्थी तयार व्हायला लागलेत. पुढे शाळेत शिक्षक कमी व्हायला लागले आणि शिक्षकांची भरती थांबल्यामुळं क्रीडा शिक्षक असणाऱ्या शरद गढीकर यांच्यावर वर्गात विविध विषय शिकविण्याची जबाबदारी अधिक वाढली. सुरुवातीला केवळ हिंदी विषय शिकवणारे शरद गडीकर आता इयत्ता दहावीला हिंदी आणि इतिहास, इयत्ता नववीला हिंदी आणि मराठी तसेच इयत्ता आठवीला इतिहास विषय शिकवतात. शरद गडीकर यांनी विद्यार्थ्यांचा सॉफ्टबॉल आणि बेसबॉल या खेळातील अधिक इंटरेस्ट पाहता गत तीन-चार वर्षात या खेळावर अधिक भर दिला. यामुळंच विभागीय राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेत बेसबॉल आणि सॉफ्टबॉल या खेळा प्रकारात बाजी मारणारी शाळा म्हणून कुंड सर्जापूरच्या शाळेनं ओळख निर्माण केलीय.