'ब्लॅक टेल', 'गोल्डन फ्लोअर' पक्षी झोडतात अमरावतीकरांचा 'पाहुणचार' अमरावती Migratory Birds In Amravati : युरोप, मध्य आशिया, तिबेट, युरेशिया, सायबेरिया या देशातून तसंच अंटार्टिका प्रदेशासह देशातील लडाख या भागातून हिवाळ्यामध्ये 64 प्रजातीच्या शेकडो पक्षांनी अमरावतीत हजेरी लावली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात येणारे हे विविध पक्षी फेब्रुवारीच्या अखेर आणि मार्च महिन्यात पुन्हा आपल्या मायदेशी परततात. पक्षांचं हे स्थलांतर निसर्गचक्रात अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे. सध्या अमरावती शहरासह अनेक भागात अनेक परदेशी पक्षी नजरेत भरत आहेत.
परदेशी पक्षांचे दिसत आहेत थवे :सध्या संपूर्ण देशात परदेशी पक्षी अनेक ठिकाणी दिसत आहेत. अमरावती शहरातील छत्री तलाव आणि वडाळी तलाव परिसरात अनेक स्थलांतरित पक्ष्यांचे सध्या वास्तव्य आहे. रानपक्षी आणि पाणपक्षी अशा दोन प्रकारचे विदेशी पक्षी भारतात सध्या आढळत आहेत. यामध्ये गुलाबी मैना, अर्ध्या पृथ्वीचा प्रवास करणारा ब्लॅक टेल गॉड विथ, पॅसिफिक गोल्डन फ्लोअर अर्थात सोनटिटवा हा अंटार्टिका प्रदेशातून सध्या भारतात आला आहे. अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात सध्या हा पक्षी आढळून येत आहे. यासह परदेशातील अनेक छोट्या आकाराचे बदक सध्या देशात सर्वत्र दिसत असल्याची माहिती पक्षी तज्ञ यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. यावर्षी नद्या, तलावांची परिस्थिती फारशी चांगली नसली, तरी परदेशातील पक्षांचं वैविध्य मात्र कायम असल्याचं देखील यादव तरटे यांनी सांगितलं.
रामसर स्थळांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर :महाराष्ट्रात एकूण साडेसतरा हजार रामसर स्थळं आहेत. परदेशी पक्षांसाठी रामसर स्थळं हे अतिशय पोषक आहेत. असं असलं तरी महाराष्ट्रातील रामसर स्थळांची परिस्थिती ऐरणीवरच आहे. रामसर स्थळांचं हवं तसं संवर्धन झालं नसल्यानं परदेशी पक्षांसाठी हे मोठं आव्हान असल्याचं देखील यादव तरटे म्हणाले.
रामसर स्थळांचं असं आहे महत्त्व :पाणथळ ठिकाण असणाऱ्या भागात परदेशी पक्षी मोठ्या संख्येनं येतात. या पाणथळ ठिकाणांना रामसर स्थळ असं म्हटलं जाते. जगभरातील अनेक देशांनी स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी पाणथळ जागा संरक्षित केल्या आहेत. त्यासाठी इराणमध्ये असणाऱ्या रामसर या शहरात 2 फेब्रुवारी 1971 ला विशेष परिषद घेण्यात आली होती. यामुळेच पाणथळ ठिकाणांना संबोधण्यासाठी रामसर हा शब्द देखील रूढ झाला. भारतानं 1 फेब्रुवारी 1982 रोजी रामसर करार स्वीकारला असल्याची माहिती देखील यादव तरटे यांनी दिली. रामसर स्थानामध्ये नद्या, दलदल, गवताळ प्रदेश, घनदाट वन यासारख्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित ठिकाणांचा पाणथळ अर्थात रामसर ठिकाणांमध्ये समावेश आहे.
महाराष्ट्रातील रामसर स्थळ :भारतात एकूण 75 रामसर स्थळं आहेत. महाराष्ट्रात ठाणे खाडीत फ्लेमिंगो सेंचुरी, बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आणि नंदुरबार जिल्ह्यातील मध्यमेश्वर हे तीनच रामसर स्थळं आहेत. राज्यात एकूण साडेसतरा हजार रामसर जागा आहेत, मात्र त्यांच्या संवर्धनाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ जवळ असणारं हातनूर जलाशय, सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशय अतिशय महत्त्वाच्या पाणथळ जागा आहेत. या जागा रामसर दर्जा देऊन त्यांचं संवर्धन करणं अतिशय गरजेचं आहे. हे शक्य झालं तर परदेशातून येणाऱ्या पक्षांचं वैविध्य आपल्याला जपता येईल, तसंच पर्यावरणाचं संतुलन देखील साधता येईल, असं देखील यादव तरटे म्हणाले.
हेही वाचा :
- Flamingo Birds in Mumbai : खाडी परिसरात परदेशी पक्षी फ्लोमिंगोचे आगमन; उपग्रहाद्वारे होणार जीपीएस सर्वेक्षण
- पुण्याच्या मावळमध्ये परदेशी पाहुण्यांचे आगमन; लक्ष वेधून घेतोय हा पाहुणा!
- ईटीव्ही भारत विशेष: पालघरच्या किनारपट्टीवर देशी-विदेशी पाहुण्यांचे आगमन