पुणे :राज्यासह पुणे शहरात थाटामाटात, मोठ्या प्रमाणावर खर्च करून विवाहसोहळे पार पडत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी अनेकजण लग्नसमारंभांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यात आकर्षक सजावट, शाही जेवण, मान्यवरांची उपस्थिती आणि लग्नाआधीच्या शूटींगचा समावेश आहे. मात्र, असं असलं तरी दुसऱ्या बाजूला पुणे शहरात या वर्षभरात जवळपास 5 हजार 500 जोडप्यांनी कोर्ट मॅरेज अर्थात नोंदणी विवाह केल्याचं समोर आलं आहे.
लग्न हे सर्वसाधारणपणे एकदाचं होतं आणि आयुष्याच्या या महत्त्वाच्या वेळेस लग्न करणाऱ्या मुलगा मुलीच्या कुटुंबातील सर्वांनी एकत्र यावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. लग्न समारंभाच्यावेळी कोणीही नाराज होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. सध्या तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून लग्न करत असल्याचं एकीकडे पाहायला मिळत आहे. मात्र, काही लोक कायदेशीर पध्दतीनं कमी खर्चात कोर्ट मॅरेज करतानाही पाहायला मिळत आहे. पुणे शहारत दर महिन्याला जवळपास 250 ते 300 जोडपी कोर्ट मॅरेज करत आहेत तर या वर्षात एकूण 5 हजार 500 जोडप्यांनी कोर्ट मॅरेज केल्याचं समोर आलं आहे.
अशी करू शकता नोंदणी : याबाबत विवाह अधिकारी संगीता जाधव म्हणाल्या, "आमचं कार्यालय हे पुण्यातील पुणे स्टेशन परिसरात असून आमच्याकडे स्पेशल मॅरेज ॲक्ट-1954 अंतर्गत जी विवाह नोंदणी केली जाते त्याची नोंद होते. जानेवारी 2024 ते आत्तापर्यंत जवळपास 5 हजार 500 विवाह नोंदणी झाल्या आहेत. विवाह नोंदणीसाठी संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन झाली असून कोणत्याही धर्माचे आणि समाजाचे लोक हे लग्न करू शकतात. शासनानं जी काही वेबसाईट दिली आहे, त्या वेबसाईटवरून विवाह नोंदणी करता येते. कोर्ट मॅरेजसाठी स्पेशल मॅरेज ॲक्ट-1954 असून त्या अंतर्गत कोर्टात मॅरेज ऑफीसरच्या देखरेखीखाली विवाह केला जातो. या लग्नात कोणत्याही प्रथा नसतात. ऑनलाईन अर्ज करत असताना जी काही कागदपत्रं लागतात त्याबाबत देखील माहिती तिथे उपलब्ध असते. अर्ज केल्यावर 4 दिवसात त्या अर्जाचं व्हेरिफिकेशन होतं आणि नंतर नोटीस जनरेट केली जाते. कायद्यानं नोटीस पीरियड हा 1 महिन्याचा असतो. पक्षकार हे तारीख ठरवून रजिस्टर करू शकतात. त्यांना लगेच मॅरेज सर्टिफिकेट दिलं जातं."