महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात पुलाचं काम करणाऱ्या 5 मजुरांचा मृत्यू ; टिप्परनं शेडवर टाकली वाळू, आत झोपलेले मजूर ठार - 5 WORKERS CRUSHED TO DEATH IN JALNA

पुलाचं काम करणारे मजूर शेडमध्ये झोपलेले असताना टिप्परचालकानं शेडवर वाळू टाकली. त्यामुळे शेडमध्ये झोपलेले 5 मजूर जागीच ठार झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

5 Workers Crushed to Death In Jalna
घटनास्थळावर जमलेला संतप्त जमाव (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2025, 9:32 AM IST

Updated : Feb 22, 2025, 1:17 PM IST

जालना :अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या टिप्परनं थेट पत्र्याच्या शेडवर वाळू ओतल्यानं वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास पासोडी परिसरात घडली. गावकऱ्यांनी वेळीच धाव घेतल्यानं वाळूच्या ढिगाऱ्याखालून एक लहान मुलीला सुखरूप बाहेर काढलं. इतर पाच जणांचा मात्र जागेवरच मृत्यू झाला आहे. जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एका पुलाच्या कामासाठी हे मजूर आले होते. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हे कुटुंब झोपलेले होते. पहाटे साडेतीन वाजता आलेल्या वाळूच्या टिप्परचालकानं वाळूचा टिप्पर पत्र्याच्या शेडवर रिचवल्यानं शेडमध्ये झोपलेले 6 जण ढिगाऱ्याखाली दबले.

महिलेच्या आरडाओरड्यानं धावले नागरिक :घरात समोरच्या खोलीत झोपलेल्या महिलेच्या हा प्रकार लक्षात आल्यानं तिनं आरडाओरडा केला. त्यामुळे टिप्परचालकानं तिथून पळ काढला. महिलेनं आजूबाजूच्या गोठ्यावर जाऊन शेतकऱ्यांना बोलावून आणलं असता त्यांनी वाळू बाजूला करून पाच जणांना बाहेर काढलं. त्यापैकी एक 12 वर्षीय मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गणेश काशिनाथ धनवई (वय -50 रा. गोळेगाव, ता. सिल्लोड ), भूषण गणेश धनवई (वय 17 रा. गोळेगाव, ता. सिल्लोड ), राजेंद्र दगडूबा वाघ (वय -40 रा. दहिद, ता. बुलढाणा) , सुनील समाधान सपकाळ, वय -20 रा. पद्मावती, ता. भोकरदन जि. जालना ), सुपडू आहेर, (वय 38 रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव ) अशी मृतकांची नावं आहेत. मृतक सर्वजण एकमेकांचं सख्खे नातेवाईक आहेत.

पुलाच्या बांधकामाला अवैध वाळूचा वापर :रवींद्र आनंद या ठेकदाराचं हे काम सुरु आहे. या कामासाठी स्वस्त वाळू उपलब्ध व्हावी या उद्देशानं ठेकेदार रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करून टाकत होता. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे, असा गावकऱ्यांनी आरोप केला.

जाफ्राबाद पोलीस पहाटे तीन वाजता धडकले घटनास्थळी :पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली असता जाफ्राबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक गावकऱ्यांनी पंचनामा न करता मृतदेह ताब्यात घेऊ नये, असा पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. अवैध वाळूचा विषय असल्यानं महसूल पथकालाही पाचारण करण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक इंगळे यांनी दिली. राज्यात वाळू उपसा बंदी असूनही अवैधरित्या सर्रास वाळू उपसा सुरू आहे. राजकीय वरदहस्त आणि पोलीस व महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं ठेकेदार मुजोर झाले आहेत, असा आरोप गावकऱ्यांनी केला.

हेही वाचा :

  1. कनौजमध्ये मोठा अपघात: इमारतीचं छत कोसळलं, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती
  2. चार मजली इमारत कोसळल्यानं तरुणीचा मृत्यू, एनडीआरएफकडून बचावमोहीम सुरू
  3. केदारनाथ यात्रा मार्गावर भूस्खलन : ढिगाऱ्याखाली दबून एका भाविकाचा मृत्यू तर तिघांना बचावण्यात यश - Debris Fall On Kedarnath Pilgrims
Last Updated : Feb 22, 2025, 1:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details