मुंबईMumbai Water Supply Reduction : पालिकेच्या अखत्यारीतील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा दिवसेंदिवस आटत चालल्याने मुंबईकरांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने राज्य सरकारची मदत घेतली. त्यानंतर मुंबईकरांवरील 10 टक्के पाणी कपातीची टांगती तलवार दूर झाल्याचं म्हटलं गेलं. मात्र, अद्याप देखील मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट दूर झालं नसल्याचं चित्र आहे. कारण, ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पालिकेने आशिया खंडातील सर्वांत मोठ्या भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या पाणी परीक्षणाचे आणि साठवणूक टाक्यांच्या स्वच्छतेचे काम हाती घेतल्याने येत्या 24 एप्रिल पर्यंत पाच टक्के पाणी कपातीचा सामना संपूर्ण मुंबईकरांना करावा लागणार आहे.
अशी चालते पाणीपुरवठा यंत्रणा :मुंबई पालिका प्रशासनाने म्हटले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून भांडूप जलशुद्धीकरण केंद्राचे परिरक्षण विषयक कामे सुरू आहेत. या कामांमुळे दिनांक 24 एप्रिल 2024 पर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात 5 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला आहे. भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून महानगरपालिकेच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. हे आशिया खंडातील सर्वांत मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे. भांडूप संकुल येथे 1 हजार 910 दशलक्ष लीटर आणि 900 दशलक्ष लीटर पाणी शुद्धीकरण करणारी दोन युनिट्स आहेत. त्यापैकी 900 दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राद्वारे प्रतिदिन 990 दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते.