छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Chhatrapati Sambhajinagar Crime News :लाडक्या कुत्र्याला आईनं मारल्यानं एका 14 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधील मिलकॉर्नर भागात घडली. मृत मुलाचे वडील अंध आहेत, तर आई किराणा दुकान चालवून घर चालवत होती. एकुलत्या एका मुलानं टोकाचं पाऊल उचलल्यानं कुटुंबीयांची अवस्था बिकट झाली आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती दिली.
घरात पाळला कुत्रा : मिल कॉर्नर भागात राहणाऱ्या 14 वर्षीय मुलानं घरात कुत्रा पाळला होता. या कुत्र्याचा त्याला चांगलाच लळा लागला होता. शुक्रवारी कुत्र्यानं घरात घाण केली म्हणून मुलाच्या आईनं कुत्र्याला चापट मारली. तसंच यावरुन त्या आपल्या मुलावरही रागावल्या. शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. त्याचवेळी मुलानं आईचा राग मनात धरून बेडरूममध्ये जात आत्महत्या केली. हा प्रकार त्याच्या आई आणि शेजारच्यांच्या निदर्शनास आल्यानं त्यांनी तत्काळ मुलाला घाटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून मुलाला मृत घोषित केलं. या घटनेची क्रांतीचौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.