मुंबई Mumbai Water Cut: मुंबईतील हजारो घरांमध्ये 10 दिवस पाणीकपात होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मंगळवारपासून 10 टक्के पाणी कपात जाहीर केलीय. पाइपलाइन दुरुस्तीच्या कामामुळं मंगळवारी 27 फेब्रुवारीपासून शहरातील विविध भागात पाणीकपात होणार असल्याची माहिती, पालिकेनं दिलीय.
या कालावधीत होणार पाणी कपात : पालिकेच्या माहितीनुसार, पाली हिल जलाशयात पुनर्वसनाचं काम केलं जाणार असल्यानं, 27 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत वांद्रे आणि खार पश्चिम येथील काही भागात 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. सध्या 14 दिवस होणारी पाणी कपात डागडुजीच्या कामासाठी असली तरी येत्या काळात मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी कपातीच्या झळा सोसाव्या लागतात की? काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.
44 टक्केच पाणीसाठा शिल्लक : मुंबईकरांवर अशी परिस्थिती ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे ती म्हणजे पालिकेकडं असलेल्या अपुऱ्या जलासाठ्यामुळं. याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या मुंबईच्या मध्य वैतरणा धरणात 13 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व 7 धरणात मिळून फक्त 44 टक्केच पाणीसाठा आता शिल्लक आहे. भातसा धरणातील राखीव जलसाठ्यातील पाणी मिळवण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. मात्र, भातसा धरणातील पाणी मिळण्याची शक्यता फार कमी असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं ऐन उन्हाळ्यात भातसा धरणातून पाणी न मिळाल्यास पालिकेकडून पाणी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.
शहराला रोज 3950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा : उन्हाळ्यातील संभाव्य पाणी कपातीसाठी पालिकेकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून, याबाबत निर्णय होणं बाकी आहे. आज घडीला मोडक सागर, मध्यवैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी धरणातून मुंबई शहराला रोज 3950 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातोय. या सातही धरणात 6 लाख 53 हजार सहा दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. या साठ्यामुळं जुलैपर्यंत मुंबईकरांची तहान भागेल. त्यामुळं पालिकेनं राज्य सरकारकडं अप्पर वैतरणा धरणातून 93 हजार 500 दशलक्ष लिटर तर, भातसा धरणातून 1 लाख 37 हजार दशलक्ष लिटर राखीव पाणी साठ्याची मागणी केलीय. आता राज्य सरकारनं ही मागणी मान्य करून पालिकेला राखीव पाणी दिल्यास ऑगस्ट महिनापर्यंत मुंबईकरांची तहान भागेल असा पालिकेचा अंदाज आहे.