बुलावायो ZIM vs PAK 3rd ODI : बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये पाकिस्तानचा फलंदाज कामरान गुलामनं शानदार शतक झळकावलं. या खेळाडूनं झिम्बाब्वेविरुद्ध 99 चेंडूत 103 धावांची खेळी खेळली होती. कामरान गुलामसाठी हे शतक खूप खास आहे, कारण हे त्याचं वनडे क्रिकेटमधील पहिलं शतक आहे. कामरान गुलामनं झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडेच्या 13व्या षटकात क्रीजमध्ये प्रवेश केला. सॅम अय्युब बाद झाल्यानंतर कामरान गुलामनं चांगली फलंदाजी करत 4 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीनं शानदार शतक झळकावलं.
कामरानची 44 दिवसांत 2 शतकं : कामरान गुलामनं 44 दिवसांत दोन आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली आहेत. या खेळाडूनं इंग्लंडविरुद्धही कसोटीत शतक झळकावलं होतं, त्यानं ही खेळी 15 ऑक्टोबरला खेळली होती. आता या खेळाडूनं झिम्बाब्वेविरुद्ध वनडे सामन्यात शतक ठोकलं आहे. कामरान गुलामची ही खेळीही खास आहे कारण त्यानं निर्णायक सामन्यात हे शतक झळकावलं आहे. वास्तविक, वनडे मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वेनं जिंकला होता आणि दुसरा सामना पाकिस्ताननं जिंकला होता, त्यामुळं तिसरा वनडे सामना व्हर्च्युअल फायनलसारखा झाला, ज्यात कामराननं शतक झळकावलं.
दिग्गज फलदाज बाबरवर टीका : कामरान गुलामनं शतक झळकावताच पाकिस्तानच्या अनेक चाहत्यांनी बाबर आझमवर टीका करायला सुरुवात केली. गेल्या तीन वर्षांत बाबरला एकही शतक झळकावता आलेलं नाही, त्याने पन्नासहून अधिक डाव खेळले आहेत, असं चाहते सांगतात. मात्र कामरान गुलामनं गेल्या 10 डावांत 2 शतकं झळकावली आहेत. कामरान गुलामच्या या खेळीनंतर बाबर आझमवरील दबाव वाढणार हे उघड आहे. विशेष बाब म्हणजे बाबर संघाबाहेर होताच कामरान गुलामनं कसोटी शतक झळकावलं होतं.
पाकिस्ताननं केल्या 300 पार धावा :झिम्बाब्वेविरुद्ध पाकिस्तानी फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या सामन्यात शतक झळकावणारा सॅम अय्युब 31 धावा करुन बाद झाला. अब्दुल्ला शफीकनं 50 धावांची इनिंग खेळली पण त्याचा स्ट्राईक रेट फक्त 73.53 होता. कर्णधार रिझवाननं 47 चेंडूत 37 धावांची खेळी खेळली. सलमान आघानं 26 चेंडूत 30 धावांची खेळी केली. परिणामी पाकिस्ताननं निर्धारित 50 षटकांत 6 बाद 303 धावा केल्या.
हेही वाचा :
- 6,6,6,6,4...पांड्यानं चेन्नईच्या बॉलरला धुतलं, एकाच ओव्हरमध्ये काढल्या 30 धावा; पाहा व्हिडिओ
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पंतप्रधानांनी घेतली भारतीय खेळाडूंची भेट