बेंगळुरु Rishabh Pant Not Playing : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. पहिल्या डावात 46 धावांत ऑलआऊट झाल्यानंतर भारतीय संघ या सामन्यात न्यूझीलंडपेक्षा खूप पिछाडीवर आहे. डावखुरा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला गुडघ्याच्या दुखापतीमुळं मैदान सोडावं लागल्यानं गुरुवारी दुसऱ्या दिवशी भारताला आणखी एक मोठा धक्का बसला.
पंतच्या दुखापतीबाबत BCCI चं मोठं अपडेट : शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी पंत मैदानात उतरला नाही. त्याच्या जागी ध्रुव जुरेल विकेटकीपिंग करत आहे. आता ऋषभ पंतच्या दुखापतीची स्थिती काय आहे? BCCI नं याबाबत एक मोठं अपडेट जारी केलं आहे. पंतच्या दुखापतीबाबत मोठं अपडेट देताना BCCI नं म्हटलं की, ऋषभ पंत तिसऱ्या दिवशी विकेटकीपिंग करणार नाही. BCCI चं वैद्यकीय पथक त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे.
पंतच्या दुखापतीचा धोका पत्करणार नाही : रोहित
तत्पूर्वी, गुरुवारी दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर बोलताना भारतीय कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं होतं की, पंतच्या तंदुरुस्तीबाबत आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही. तो म्हणाला, दुर्दैवानं चेंडू सरळ त्याच्या गुडघ्यावर आदळला, त्याच पायावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यावर थोडी सूज आहे. आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही. ऋषभलाही कोणताही धोका पत्करायचा नाही, कारण त्याच्या पायावर मोठी शस्त्रक्रिया झाली आहे.
पंतला दुखापत कशी झाली?
न्यूझीलंडच्या डावातील 37व्या षटकात ऋषभ पंतला ही दुखापत झाली. त्यानं रवींद्र जडेजाचा चेंडू जमा केला आणि डेव्हन कॉनवेचं स्टंपिंग हुकलं आणि चेंडू थेट त्याच्या उजव्या गुडघ्यापर्यंत गेला. हा तोच गुडघा होता ज्यावर डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर पंतला तत्काळ मैदान सोडावं लागलं आणि त्याच्या जागी ध्रुव जुरेलला विकेटकीपिंगसाठी बोलावण्यात आलं.
हेही वाचा :
- पदार्पणाच्या कसोटीत 16 विकेट, सलग 59 ओव्हर गोलंदाजी; 'या' भारतीय गोलंदाजाचा विश्वविक्रम 36 वर्षांनंतर आजही कायम
- 5600 दिवसांत पहिल्यांदाच 'असं' घडलं; दक्षिण आफ्रिकेनं केला सर्वात मोठा 'अपसेट'