नवी दिल्ली WTC Point Table : न्यूझीलंड क्रिकेट संघाला पुढील 2 महिन्यांत आशियाई उपखंडात एकूण 6 कसोटी सामने खेळायचे आहेत. याची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्ध 9 सप्टेंबरपासून ग्रेटर नोएडा इथं होणाऱ्या एक सामन्याच्या कसोटी मालिकेनं झाली. खराब हवामानाचा परिणाम या सामन्यावर दिसून आला, त्यामुळं हा सामनाच रद्द झाला आहे, हा सामना रद्द झाल्यानं त्याचा परिणाम सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) तिसऱ्या आवृत्तीच्या गुणतालिकेत दिसून येईल की नाही, हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे.
हा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग नाही : जेव्हा ICC नं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरु केली होती. तेव्हा 9 देशांना क्रमवारीच्या आधारावर खेळण्याची परवानगी होती, जी कटऑफ तारखेनुसार ठरवली जाते. अफगाणिस्तानला कसोटी सामने खेळण्याचा दर्जा मिळाला असला, तरी सध्या हा संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत 12व्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत हा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेचा भाग नाही. अफगाणिस्तान व्यतिरिक्त, आयर्लंड आणि झिम्बाब्वे देखील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नाहीत. सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत आयर्लंड 10व्या तर झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान 11व्या आणि 12व्या स्थानावर आहेत.