पुणे Washington Sundar 7 Wickets Haul : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवला जात आहे. यात न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा डाव 259 धावांतर संपुष्टात आला. बंगळुरु कसोटी सामन्यात 8 गडी राखून झालेल्या पराभवानंतर, भारतीय संघानं या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग 11 तीन मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला, ज्यात शुभमन गिलचं पुनरागमन निश्चित मानलं जात होतं. याशिवाय आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांचाही समावेश होता. प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन करण्यासोबतच वॉशिंग्टन सुंदरनं आतापर्यंतच्या खेळाच्या 2 सत्रांमध्ये आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलं आहे. त्यानं सात विकेट घेत कीवी संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडलं.
1329 दिवसांनी कसोटीत पुनरागमन :मार्च 2021 मध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यात वॉशिंग्टन सुंदरनं शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्यानं आज कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. अशा स्थितीत पुणे कसोटी सामन्यात जेव्हा त्यानं रचिन रवींद्रला त्याच्या शानदार ऑफ-स्पिन चेंडूनं बाद करत सामन्यातली पहिली विकेट घेतली, तेव्हा त्याला 1329 दिवसांनी कसोटीत पहिली विकेट मिळाली. चौथ्या विकेटसाठी रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांच्यातील धोकादायक भागीदारी तोडण्याचं काम सुंदरनं केलं. तसंच यानंतर त्यानं सहा विकेट घेत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला आहे.
मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघाचा प्रयत्न : बेंगळुरु कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ आता पुणे कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करत आहे. या सामन्यात किवी संघ 2 प्रमुख फिरकीपटूंसोबत खेळत आहे, ज्यात मिचेल सँटनरचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. यात कीवींचा पहिला डाव 259 धावांत संपुष्टात आला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक सात विकेट घेतल्या. तर अश्विननंही 3 बळी घेत कीवींना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं.