वडोदरा 7 Fours in 6 Balls : विजय हजारे ट्रॉफीच्या प्री-क्वार्टरफायनल सामन्यात तमिळनाडूचा सलामीवीर फलंदाज एन. जगदीशननं शानदार फलंदाजी करुन सर्वांचं मन जिंकलं आहे. या खेळाडूनं स्फोटक फलंदाजीचं एक जबरदस्त उदाहरण सादर केलं. या उजव्या हाताच्या सलामीवीरानं एकाच षटकात सलग 6 चौकार मारले. जगदीशननं राजस्थानचा सलामीचा गोलंदाज अमन शेखावतच्या षटकात ही कामगिरी केली. मनोरंजक गोष्ट म्हणजे शेखावतनं त्याच्या एका षटकात 7 चौकारांसह त्यानं एकूण 29 धावा दिल्या.
एकाच षटकात सात चौकार : उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज त्याचा दुसरा षटक टाकण्यासाठी आला आणि त्याचा पहिलाच चेंडू वाईड झाला, ज्यावर चौकार लागला. यानंतर, अमन शेखावतनं पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. अमन शेखावतनं सतत शॉर्ट बॉल टाकले आणि जगदीशननं ऑफ साईडच्या बाहेर कट करुन आणि ऑन साईडवर पुल शॉट खेळून सलग 6 चौकार मारले. अशाप्रकारे, अमनच्या प्रत्येक चेंडूवर तामिळनाडूला चौकार मिळाला. अमन शेखावत सध्या एक तरुण गोलंदाज असून त्यानं फक्त 4 लिस्ट-ए सामने खेळले आहेत.