T20 World Cup 2024 NZ vs AFG :टी-20 विश्वचषक 2024 च्या 14 व्या सामन्यात अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने होते. या सामन्यात अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा 84 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केलाय. कर्णधार राशीद खान, फजल हक फारुकी आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी अफगाणिस्तानला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. गयाना प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावून 159 धावा केल्या. रहमानउल्ला गुरबाजनं संघासाठी सर्वात मोठी खेळी केली. त्यानं 56 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 80 धावा केल्या.
न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. प्रथम फलंदाजी करताना रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी अफगाणिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 103 धावांची (87 चेंडू) भागीदारी केली. ज्यामुळं संघाला चांगली धावसंख्या उभारता आली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघ 15.2 षटकात अवघ्या 75 धावांवर सर्वबाद झाला.
अफगाणिस्तानची धडाकेबाज फलंदाजी : अफगाणिस्तानसाठी रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान सलामीला आले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली आणि 87 चेंडूत 103 धावा केल्या. ही भागीदारी 15 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर संपुष्टात आली. इब्राहिम झद्रान 41 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 44 धावा काढून बाद झाला. त्यानंतर 17व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अजमतुल्ला उमरझाईच्या रुपानं संघाला दुसरा धक्का बसला. उमरझाईनं 13 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 22 धावांची खेळी केली. त्यानंतर 18व्या षटकात गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या मोहम्मद नबीच्या रुपानं संघानं तिसरी विकेट गमावली. यानंतर संघाला 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर राशीद खानच्या रुपानं चौथा धक्का बसला. राशीदला 5 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीनं 6 धावा करता आल्या. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर रहमानउल्ला गुरबाज 80 धावांवर बाद झाला.