पल्लेकेले SL vs WI 2nd ODI Live Streaming : श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेनंतर 20 ऑक्टोबरपासून वनडे मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी 20 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान श्रीलंकानं 5 विकेटनं विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात यजमान श्रीलंका संघ हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल तर करेबियन संघ हा सामना जिंकत मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल.
पहिल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय :तत्पुर्वी मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 54 धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र यानंतर पावसाचा व्यत्यय आला आणि पावसामुळं षटकं कापून 37-37 षटकांचा निर्णय घेण्यात आला. यानंतर वेस्ट इंडिज संघानं 37 षटकांत 4 गडी गमावून 185 धावा केल्या. वेस्ट इंडिजसाठी शेरफेन रदरफोर्डनं नाबाद 74 धावांची शानदार खेळी केली. तर श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगानं सर्वाधिक दोन बळी घेतले. वानिंदू हसरंगाशिवाय जेफ्री वांडरसे आणि चरिथ असलंका यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
श्रीलंकेचा पाच गडी राखून विजय : यानंतर डीएलएसच्या नियमांनुसार हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला 37 षटकांत 232 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघानं अवघ्या 31.5 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठलं. श्रीलंकेसाठी, चरिथ असलंकानं सर्वाधिक 77 धावांची खेळी केली, तर वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोटीनं सर्वाधिक तीन बळी घेतले. गुडाकेश मोटीशिवाय अल्झारी जोसेफनं दोन गडी बाद केले.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 65 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात श्रीलंकेच्या संघानं 31 सामने जिंकले असून वेस्ट इंडिजनं 31 सामने जिंकले आहेत. तर 3 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही. श्रीलंकेच्या भूमीवर दोन्ही संघांमध्ये 18 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत श्रीलंकेनं 13 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजचा संघ केवळ 3 सामने जिंकू शकला आहे. 2 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही. या मालिकेत श्रीलंकेचा वरचष्मा राहिला आहे.
श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट संघ या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना 20 ऑक्टोबर (रविवार) रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले इथं दुपारी 02:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक दुपारी 02.00 वाजता होईल.