हैदराबाद IPL 2024 SRH vs MI :आयपीएल 2024 च्या 8 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केलाय. या सामन्यात हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 277 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 20 षटकात 5 बाद 246 धावाच करू शकला. तिलक वर्मानं मुंबईसाठी बराच वेळ प्रयत्न केला आणि 64 धावांची शानदार खेळीही खेळली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
नाणफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय : या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हीच त्यांच्यासाठी या सामन्यात मोठी चूक ठरली. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. मुंबई या धावसंख्येचा पाठलाग करू शकली नाही. मुंबईच्या फलंदाजांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले असले तरी विजय मिळवता आला नाही.
मुंबईची आक्रमक सुरुवात : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या असलेल्या 278 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई संघाची चांगली सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 20 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. पण त्यांना चौथ्या षटकात इशान किशनच्या रुपानं पहिला धक्का बसला. तो 13 चेंडूंत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 34 धावा काढून बाद झाला. त्यानंतर मुंबईनं रोहित शर्माच्या रुपानं दुसरी विकेट गमावली. तो पाचव्या षटकात 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 26 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 37 चेंडूत 84 धावांची भागीदारी केल्यानं चाहत्यांच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या. पण ही भागीदारी 11 व्या षटकात 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 30 धावा करुन बाद झालेल्या नमन धीरच्या विकेटनं संपुष्टात आली.
टीम डेव्हिडचे प्रयत्न अपुरे : नंतर 15 व्या षटकात टिलक वर्माही पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यानं 34 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार लगावत 64 धावा केल्या. यानंतर 18व्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्याच्या रुपानं संघाला पाचवा धक्का बसला. कर्णधार पंड्यानं 20 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार मारत 24 धावा केल्या. बाद होण्यापूर्वी हार्दिकनं टीम डेव्हिडसोबत पाचव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली होती. टीम डेव्हिडनं शेवटपर्यंत उभं राहून 22 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 42 धावा केल्या, मात्र संघाला विजय मिळवून देण्यासाठी त्याचे प्रयत्न अपुरे पडले.