मुंबई Team India Bowling Coach : भारतीय क्रिकेट संघाची पुढची मालिका सुरु होण्यास अजून वेळ आहे आणि सर्व खेळाडू ब्रेकवर आहेत किंवा काही देशांतर्गत टूर्नामेंटची तयारी करत आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील पुढील मालिकेपूर्वी विश्रांती घेत आहेत. दरम्यान, त्यांची एक मोठी मागणीही पूर्ण झाली आहे. गौतम गंभीरच्या मागणीवरुन भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलची (Morne Morkel) भारतीय क्रिकेट संघाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मॉर्केलनं याआधीही गंभीरसोबत आयपीएलमध्ये काम केलं आहे.
कधीपासून स्विकारेल जबाबदारी : बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. मोर्ने मॉर्केल भारतीय क्रिकेट संघाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक असेल आणि 1 सप्टेंबरपासून तो आपली जबाबदारी स्वीकारेल. अशाप्रकारे तो भारत-बांगलादेश कसोटी मालिकेतील संघासोबत राहील. दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये जवळपास 550 बळी घेतलेल्या मॉर्केलनं यापूर्वी काही संघांसोबत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे.
गंभीरचा सपोर्ट स्टाफ पूर्ण :भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी गौतम गंभीरनं बीसीसीआयसमोर आपल्या आवडीचा सपोर्ट स्टाफ मिळावा, अशी अट ठेवली होती. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर आणि शक्यतांनंतर अखेर त्याचा स्टाफ पूर्ण झाला आहे. याआधीही बोर्डानं नेदरलँडचा माजी फलंदाज रायन तेंडोशकाटे आणि माजी भारतीय फलंदाज अभिषेक नायर यांची सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. यानंतर हे प्रकरण फक्त गोलंदाजी प्रशिक्षकावरच अडकलं आणि गंभीरला या भूमिकेसाठी फक्त मॉर्केल हवा होता, ज्यासाठी सुरुवातीला बीसीसीआयला फारसा रस वाटला नाही. अखेर, गंभीरच्या सल्ल्यानुसार बोर्डानं दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाची नियुक्ती केली आहे.