अनंतपूर Shreyas Iyer Out on Duck : भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरचा आजचा दिवस खूप वाईट आहे. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात तो फ्लॉप ठरला. यानंतर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नाही आणि आता दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यातही हा खेळाडू सपशेल अपयशी ठरला. अशाप्रकारच्या अपयशानंही त्यांची खिल्ली उडवली जात आहे. श्रेयस अय्यरची खिल्ली उडवण्याचं कारण म्हणजे तो शून्यावर बाद झाला हे नाही, तर त्याच्या शैलीमुळं. वास्तविक, अय्यर पहिल्या डावात फलंदाजीला आला तेव्हा त्यानं गडद काळा चष्मा लावला होता. अय्यरला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि त्यानंतर अय्यर सातव्या चेंडूवरच शून्यावर बाद झाला.
अय्यरची उडवली खिल्ली : श्रेयस अय्यरला खलील अहमदनं बाद केलं. या डाव्या हाताच्या गोलंदाजानं त्याला आकिब खानकरवी झेलबाद केलं. अय्यर बाद झाल्यानंतर त्याची खिल्ली उडवली गेली. गडद काळा चष्मा घालून फलंदाजी करणं चाहत्यांना योग्य वाटलं नाही. काही चाहत्यांनी असा युक्तिवाद केला की, सूर्य त्या दिशेला नाही ज्यासाठी चष्मा घालणं आवश्यक आहे. इंडिया सी विरुद्धच्या सामन्यातही अय्यर पहिल्या डावात 9 धावा करुन बाद झाला होता. दुसऱ्या डावात त्यानं अर्धशतक झळकावलं असलं तरी भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी अय्यरला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल.