बंगळुरु IPL 2024 RCB vs LSG :केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स (LSG) नं इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात चांगलीच चमक दाखवलीय. या मोसमात त्यांनी आतापर्यंतचा तीनपैकी दुसरा सामना जिंकलाय. मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध झालेल्या सामन्यात लखनौनं 28 धावांनी शानदार विजय मिळवला.
आरसीबीच्या फलंदाजांची निराशा : या सामन्यात आरसीबीसमोर 182 धावांचं लक्ष्य होते. त्याच्या प्रत्युत्तरात संघ 153 धावांवरच मर्यादित राहिला. त्यांना सामना गमवावा लागला. आरसीबी या मोसमात ऑलआऊट होणारा पहिला संघही ठरलाय. आरसीबीकडून महिपाल लोमरनं सर्वाधिक 13 चेंडूत 33 धावांची शानदार खेळी केली. तर आतापर्यंत फ्लॉप ठरलेल्या रजत पाटीदारनंही 29 धावा केल्या. पण दोघांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.
पुन्हा एकदा मयंक यादवच्या वेगाचा कहर : मागील सामन्याचा हिरो ठरलेल्या मयंक यादवनं या सामन्यातही पुन्हा एकदा आपल्या वेगाची जादू दाखवत 3 बळी घेतले. तर नवीन उल हकला 2 बळी मिळाले. याशिवाय मार्कस स्टॉइनिस, यश ठाकूर आणि एम सिद्धार्थ यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. अशाप्रकारे लखनौनं गोलंदाजांच्या जोरावर या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला.