मुंबई Ranji Trophy 2024 Final : मुंबईनं रणजीच्या अंतिम सामन्यात विदर्भाचा 169 धावांनी पराभव करुन रणजी 2023-24 चं विजेतेपद पटकावलंय. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईनं चमकदार कामगिरी केली. त्यासाठी मुशीर खान, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांनी मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला. मुशीरनं दुसऱ्या डावात शतक झळकावलं होतं. अय्यरनं 95 धावांची खेळी केली होती. मुंबईनं पहिल्या डावात 224 तर दुसऱ्या डावात 418 धावा केल्या होत्या. विदर्भानं पहिल्या डावात 105 धावा आणि दुसऱ्या डावात 368 धावा केल्या. यासह मुंबईनं तब्बल 42व्यांदा रणजी चषकावर आपलं नाव कोरलंय. 2015-16 नंतर मुंबईनं मिळवलेला हा पहिला विजय आहे.
शेवटच्या दिवशी सामना रंगतदार स्थितीत : अंतिम सामन्याबद्दल बोलायचं झालं तर मुंबई संघानं प्रथम फलंदाजी करताना 224 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ पहिल्या डावात फलंदाजीला आला तेव्हा 105 धावा करुन गडगडला. पहिल्या डावाच्या आधारे मुंबई संघाला 119 धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात मुशीर खानचं शतक, श्रेयस अय्यर, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि शम्स मुलाणी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईनं 418 धावा केल्या. मुंबईनं विदर्भासमोर 538 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं.
बक्षिसांची रक्कम दुप्पट : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे आणि ऍपेक्स कौन्सिलने रणजी ट्रॉफीच्या बक्षिसांची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतलाय. "'एमसीए' रणजी ट्रॉफीच्या विजेत्या संघाला पाच कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम देणार आहे. एमसीएसाठी हे वर्ष खूप चांगलं आहे. असोसिएशननं 7 विजेतेपदं जिंकली आहेत. तसंच बीसीसीआय स्पर्धांमध्ये सर्व वयोगटांमध्ये बाद फेरी गाठली आहे," अशी माहिती MCA चे सचिव अजिंक्य नाईक यांनी दिली.