पॅरिस Paris Olympics 2024 :जगातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला तिरंदाजी संघानं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात भारतीय तिरंदाजांनी दमदार कामगिरी केली. भारताच्या महिला संघात दीपिका कुमारी, अंकिता भकट आणि भजन कौर यांचा समावेश आहे. पुरुष संघात धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण यांचा समावेश आहे. सांघिक कामगिरी चांगली राहिल्यामुळं भारतीय संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहचला.
तरुणदीप राय चौथी ऑलिम्पिक स्पर्धा खेळतोय, तर प्रविण दुसऱ्यांदा या स्पर्धेत उतरलाय. धिरज पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत उतरलाय. तरुणदीप 337 गुणांसह 14व्या क्रमांकावर होता. तर प्रविण (328) व धिरज (335) हे अनुक्रमे 24 व 37व्या क्रमांकावर होते. भारत पहिल्या टप्प्यात 1000 गुणांसह सहाव्या क्रमांकावर होता.
धिरजनं मिळवले सर्वाधिक गुण : दुसऱ्या टप्प्यात भारतीय खेळाडूंनी चांगलं कमबॅक केलं. 2013 गुणांसह भारतीय संघानं गटात तिसऱ्या क्रमांकाची जागा पक्की केली आणि उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला. कोरिया 2049 गुणांसह अव्वल राहिला, तर फ्रान्स 2025 गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला. भारताकडून धिरजनं सर्वाधिक 681 गुण मिळवत चौथं स्थान निश्चित केलं. तरुणदीप 674 व प्रविण 658 गुणांसह अनुक्रमे 14व्या व 39व्या स्थानावर राहिले. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना तुर्की विरुद्ध कोलंबिया यांच्यातील विजेत्या संघाशी होणार.
अंकिता चमकली : भारतीय महिला संघाला तिरंदाजीत यश मिळालं असून संघानं चौथ्या क्रमांकावर राहून उपांत्यपूर्व फेरीत गाठली. ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणाऱ्या अंकिता भकटनं चमकदार कामगिरी केली. 26 वर्षीय अंकितानं 666 गुणांसह भारतीय महिला तिरंदाजांमध्ये सर्वोत्तम मानांकन मिळवलं. सांघिक स्पर्धेत भारतानं 1983 गुणांसह चौथं स्थान पटकावलं. दक्षिण कोरियाचा संघ 2046 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. यानंतर चीन दुसऱ्या आणि मेक्सिको तिसऱ्या स्थानावर आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना फ्रान्स विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील विजेत्या संघाशी होणार.
पदक जिंकण्यासाठी फक्त दोन विजय :26 वर्षीय अंकितानं 666 गुणांसह भारतीय महिला तिरंदाजांमध्ये सर्वोत्तम मानांकन मिळवलं. यानंतर भजन कौर 559 गुणांसह 22व्या क्रमांकावर राहिली, तर दीपिका कुमारी 658 गुणांसह 23व्या क्रमांकावर आहे. भारतीय महिला आणि भारतीय पुरूष संघाला ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी फक्त दोन विजयांची गरज आहे.
हेही वाचा
- जगातील सर्वात मोठ्या क्रिडा महोत्सवाला सुरुवात; 'या' खेळाडूंकडून भारताला पदकाची अपेक्षा - Paris Olympics 2024
- ब्रिटनचा दिग्गज टेनिसपटू अँडी मरेनं पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी घेतला मोठा निर्णय; सोशल मीडियावर दिली माहिती - Paris Olympics 2024
- भारतीयांसाठी अनोळखी असणाऱ्या गोल्फचा काय आहे इतिहास? मागील ऑलिम्पिकमध्ये पदकानं हुलकावणी दिलेल्या 'आदिती'ला यंदा पदक मिळेल? - Paris Olympics 2024
- भारतीय महिला तिरंदाजी संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत; कोरियानं मिळवले विक्रमी गुण - Paris Olympics 2024