पॅरिस Paris Olympics 2024 Badminton : भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेनला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत सध्याचा ऑलिम्पिक चॅम्पियन डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनकडून पराभव पत्करावा लागला आहे. यामुळं त्याचं अंतिम फेरीत जाण्याचं स्वप्न भंगलं असलं तरी तो आता कांस्यपदका सामना खेळेल. हा सामना जिंकत देशाला आणखी एक पदक मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. लक्ष्य सेनचा कांस्यपदाकासाठीचा सामना सोमवारी सायंकाळी 6 वाजता होणार आहे.
पहिला सेट थोडक्यात हुकला : भारताच्या 22 वर्षीय युवा शटलरनं सामन्याची सुरुवात धमाकेदार केली. लक्ष्यनं सुरुवातीला आक्रमक पवित्रा स्वीकारला आणि मध्यंतरापर्यंत 11-9 गुणांसह 2 गुणांची आघाडी घेतली होती. यानंतरही लक्ष्यनं चमकदार कामगिरी करत प्रतिस्पर्धी खेळाडूला एकही संधी दिली नाही. पहिल्या सेटमध्ये लक्ष्य 18-15 नं आघाडीवर होता. पण व्हिक्टरनं जोरदार पुनरागमन करत स्कोअर 20-20 असा बरोबरीत आणला आणि त्यानंतर सलग दोन गेम पॉइंट घेत पहिला सेट 22-20 असा जिंकला.
दुसरा सेटही रोमांचक : दोन्ही खेळाडूंमधील दुसरा सेटही अतिशय रोमांचक झाला. दुसऱ्या गेममध्ये 7-0 नं पिछाडीवर पडल्यानंतर एक्सेलसेननं शानदार पुनरागमन केलं. मात्र, मध्यांतरापर्यंत लक्ष्य सेननं 11-10 अशी आघाडी घेतली. पण यानंतर पुन्हा त्यानं आपली आघाडी गमावली आणि दुसरा सेट कट्टर प्रतिस्पर्धी व्हिक्टर एक्सेलसेनकडून 14-21 असा गमावला आणि उपांत्य फेरीतून बाहेर पडला.