मुलतान PAK vs ENG 1st Test Live Streaming : इंग्लंड आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका आज 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यापुर्वी 2022 मध्ये त्यांच्या मागील पाकिस्तान दौऱ्यात, इंग्लंडनं कसोटी मालिकेत 3-0 असा विजय मिळवला होता. या मालिकेतही त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल.
सामन्यापुर्वी इंग्लंडला मोठा धक्का : मात्र आता या सामन्याआधी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला असून कर्णधार बेन स्टोक्स मुलतान या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी ऑली पोप इंग्लंडचं कर्णधारपद सांभाळणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पोप हा इंग्लंडचा कर्णधार होता आणि त्याच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडनं कसोटी मालिका 2-1 नं जिंकली होती. विशेष म्हणजे सामन्याच्या दोन दिवस आधीच इंग्लंड संघानं आपला अंतिम संघ जाहीर केला होता.
ब्रेडन कार्सला पदार्पणाची संधी : डरहमचा वेगवान गोलंदाज ब्रेडेन कार्स पाकिस्तानविरुद्धच्या आजपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. तसंच सॉमरसेटचा फिरकीपटू जॅक लीच जानेवारीत भारत दौऱ्यानंतर प्रथमच कसोटी संघात परतला आहे. इंग्लंड संघाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. सलामीवीर फलंदाज जॅक क्राऊली बोटाच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला असून तोही प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे.
संघात अनेक फलंदाज : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजीची जबाबदारी जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रुट आणि हॅरी ब्रूक यांच्यावर असेल. डकेट आणि ब्रूक गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांनी दोघांनी इंग्लंड संघाला अनेक सामने जिंकण्यास मदत केली आहे. जो रुटचा पाकिस्तानमधील अनुभव इंग्लंडला उपयोगी पडणार असून तो पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यास उत्सुक असेल.
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचं पूर्ण वेळापत्रक :
- पहिला कसोटी सामना : 7-11 ऑक्टोबर, मुलतान क्रिकेट स्टेडियम
- दुसरा कसोटी सामना : 15-19 ऑक्टोबर, मुलतान क्रिकेट स्टेडियम
- तिसरा कसोटी सामना : 24-28 ऑक्टोबर, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम
हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 88 कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी इंग्लंडनं 28 जिंकले आहेत आणि पाकिस्तानी संघ 21 जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. तर 39 कसोटी सामने अनिर्णित राहिले.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रुट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच, शोएब बशीर