मुलतान Playing 11 For 2nd Test : पाकिस्तान क्रिकेट संघ 17 जानेवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. दोन्ही संघांमधील या कसोटी मालिकेतील सामने मुलतानमधील स्टेडियमवर खेळवले जात आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना पाकिस्ताननं जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यानंतर आता पाकिस्तान संघानं दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी 14 तासांआधी त्यांच्या प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे, ज्यात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाज कासिफ अलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
प्लेइंग 11 मध्ये चार फिरकीपटूंना स्थान : मुलतान स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघानं पहिल्या सामन्याप्रमाणेच त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये चार फिरकी गोलंदाजांचा समावेश केला आहे, तर फक्त एक वेगवान गोलंदाज कासिफ अलीला स्थान मिळालं आहे. पहिल्या सामन्यात फिरकीपटू साजिद खान आणि नोमान अली यांनी वेस्ट इंडिजच्या 19 विकेट घेतल्या होत्या. ही जोडी पुन्हा एकदा आपल्या फीरकीची जादू दाखवण्यासाठी सज्ज आहे.
कासिफ अलीची कामगिरी कशी : प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कासिफ अलीनं संघात स्थान मिळवलं आहे. प्लेइंग इलेव्हनमधील एकमेव वेगवान गोलंदाज 30 वर्षीय काशिफ अली पाकिस्तानकडून पदार्पण करणार आहे. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजानं 31 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 28.49 च्या सरासरीनं 101 विकेट्स घेतल्या आहेत.
पहिल्या सामन्यात काय झालं : पहिल्या कसोटीत, पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजीचे वर्चस्व त्यांच्या यशाचं गमक होतं. 251 धावांचं लक्ष्य राखताना, त्यांनी दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा डाव फक्त 123 धावांत गुंडाळला. ऑफस्पिनर साजिद खाननं शानदार कामगिरी केली, दुसऱ्या डावात उल्लेखनीय पाच बळी घेतले आणि उपखंडीय परिस्थितीत सामना जिंकणारा गोलंदाज म्हणून त्याची प्रतिष्ठा कायम ठेवली. फलंदाजीतही संघानं प्रभावी योगदान दिलं.