नवी दिल्ली Pakistan vs Bangladesh Test : पाकिस्तान क्रिकेट संघासाठी सध्या काहीही चांगलं घडत नसल्याचं दिसतंय. आधी बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव झाला आणि आता आयसीसीनं त्यांना मोठी शिक्षा दिली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या पॉइंट टेबलमध्ये त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. रावळपिंडी कसोटीदरम्यान स्लो ओव्हर रेटमुळं आयसीसीनं त्यांचे गुण कापले आहेत. पाकिस्तानच नाही तर बांगलादेशलाही दंड ठोठावण्यात आला आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेशचे गुण कापले : बांगलादेशनं रविवारी पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव करत इतिहास रचला. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीतील हा त्याचा पहिलाच विजय आहे. या सामन्यानंतर आयसीसीनं पाकिस्तानचे 6 गुण कापले असून संपूर्ण संघाला मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावला आहे. दुसरीकडे, बांगलादेशचेही 3 गुण वजा करण्यात आले आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील गुण वजा म्हणजे अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दोन्ही संघांच्या आशा मावळल्या आहेत.
आयसीसीनं निवेदनात काय म्हटलं : आयसीसीनं सोमवारी आपल्या निवेदनात म्हटलं की, 'पाकिस्ताननं कसोटीदरम्यान सहा षटकं कमी टाकल्याबद्दल सहा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण गमावले, तर पाहुण्या बांगलादेशनं तीन षटकं कमी गोलंदाजी केल्याबद्दल त्यांचे तीन गुण कापले गेले.' तसंच पाकिस्तानला मॅच फीच्या 30 टक्के, तर बांगलादेशला 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.