नवी दिल्ली Pakistan Squad T20 World Cup 2024 :आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ सुरू होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर टी-२० विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. इतर सर्व संघांनी या महिन्याच्या सुरुवातीला त्यांचे संघ जाहीर केले होते. गेल्या विश्वचषक २०२२ मध्ये उपविजेते ठरलेल्या पाकिस्तान संघाची कमान बाबर आझमच्या हाती असेल.
मोहम्मद आमिरचं पुनरागमन :वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरचाही संघात समावेश करण्यात आलाय. २०१० च्या इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट, वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ आणि आमिरवर बंदी घालण्यात आली होती. हे तिघेही लॉर्ड्स कसोटीत स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळले होते. यानंतर तिघांनाही क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली. यानंतर २०१५ मध्ये आयसीसीनं आमिरवरील बंदी मुदतपूर्व उठवली होती. या वेगवान गोलंदाजाची बंदी २ सप्टेंबरला संपणार होती. मात्र आयसीसीने ही बंदी आधीच उठवली.
या खेळाडूंना विश्वचषकासाठी पहिल्यांदाच संधी :टी-२० विश्वचषक २०२४ साठी पाकिस्तानी संघात १५ खेळाडूंना संधी मिळालीय. यापैकी अबरार अहमद, आझम खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, सैम अयुब आणि उस्मान खान हे पहिल्यांदाच टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार आहेत. मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम यांनाही संघात स्थान मिळालय. या दोघांनी २०१६ आणि २०२१ मध्ये पाकिस्तानकडून टी-२० विश्वचषक खेळला होता. पाकिस्तानी संघानं २००९ च्या टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलय. तेव्हा संघाचा कर्णधार युनूस खान होता. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघानं २०२२ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र इंग्लंडविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारत पाकिस्तान सामना कधी रंगणार? : पाकिस्तान संघाला ६ जून रोजी अमेरिकेविरुद्ध टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये पहिला सामना खेळायचा आहे. यानंतर ९ जून रोजी भारती-पाकिस्तान यांच्यात लढत होणार. पाकिस्तानचा सामना ११ जूनला कॅनडा आणि १६ जूनला आयर्लंडशी होणार आहे.