रावळपिंडी Pak vs Ban 2nd Test Live :पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशनं दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या होत्या. आता सामन्याच्या शेवटच्या दिवशी बांगलादेशला विजयासाठी 143 धावा करायच्या आहेत, तर पाकिस्तानला 10 विकेट्सची गरज आहे. आज चौथ्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं पुर्ण खेळ होऊ शकला नाही.
पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाची भिती : बांगलादेशनं दुसरी कसोटी जिंकल्यास मालिकेत क्लीन स्वीप होईल. बांगलादेशनं मालिकेतील पहिला कसोटी सामना 10 गडी राखून जिंकली. जर बांगलादेशनं दुसराही कसोटी सामना जिंकला तर ते पाकिस्तानला प्रथमच कसोटी मालिकेत पराभूत करतील. अशा परिस्थितीत पाकिस्तानला जगात नाचक्की भीती आहे.
बाबर आझमची फ्लॉप :तत्पूर्वी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्ताननं दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 9 धावा केल्या होत्या. सामन्याच्या चौथ्या दिवशीही पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. माजी कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरला. पाकिस्तानकडून आघा सलमाननं सर्वाधिक 71 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या तर यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननं 73 चेंडूत 43 धावा केल्या.