वेलिंग्टन Gus Atkinson Hat-trick : वेलिंग्टनच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज गस ऍटिन्सननं हॅट्ट्रिक साधली ज्यात त्यानं किवी संघाचे शेवटचे तीन विकेट लागोपाठ चेंडूत घेतले. या सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 280 धावांवरच मर्यादित होता, त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या खेळात न्यूझीलंड संघाचा दुसरा डाव अवघ्या 125 धावांत आटोपला.
तीन वर्षांनंतर एखाद्या गोलंदाजाची कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक : गस एटिंकसनच्या आधी, शेवटच्या वेळी कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम 2021 साली पाहायला मिळाला होता, जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा फिरकी गोलंदाज केशव महाराज यानं वेस्ट इंडिजविरुद्ध हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. आता ॲटिंकसननं हे करण्यात यश मिळवलं असून, इंग्लंडकडून कसोटीत अशी कामगिरी करणारा तो 14 वा खेळाडू ठरला आहे. ॲटिंकसनने आपल्या 9व्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर नॅथन स्मिथ, मॅट हेन्री आणि टीम साऊदी यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचा पराक्रम केला. हेन्री आणि साऊथी गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतले, तर स्मिथनं 14 धावांची खेळी केली. त्याचबरोबर, न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह इथं कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा गस ॲटिंकसन हा पहिला गोलंदाज ठरला आहे.