क्राइस्टचर्च Playing 11 Announced : इंग्लंड क्रिकेट संघानं न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी आपली प्लेइंग 11 जाहीर केली. विशेष म्हणजे इंग्लंड संघानं तब्बल 48 तासाआधीच आपल्या संघाची प्लेइंग 11 जाहीर केली आहे. यात इंग्लंडकडून जेकब बेथेल पदार्पण करणार आहे. या युवा अष्टपैलू खेळाडूची तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवड करण्यात आली आहे. तर फलंदाजीच्या क्रमवारीत झालेल्या फेरबदलात ऑली पोपला सहाव्या क्रमांकावर ठेवण्यात आलं आहे. तो विकेटकीपिंग करताना दिसणार आहे. दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना 28 नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्चमध्ये सुरु होणार आहे.
तिसऱ्या क्रमांकावर केली नाही फलंदाजी :बेथेल गेल्या महिन्यात 21 वर्षांचा झाला. याआधी त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कधीही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केलेली नाही. वॉर्विकशायरकडून खेळणाऱ्या या अष्टपैलू फलंदाजानं 20 सामन्यांमध्ये 25.44 च्या सरासरीनं 738 धावा केल्या आहेत. त्यानं आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत सात विकेट्सही घेतल्या आहेत. तसंच त्यानं बर्मिंगहॅम फिनिक्ससाठी 7 सामन्यांत 165 धावा केल्यानंतर इंग्लंडकडून T20 आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
जॉर्डन कॉक्स दुखापतीमुळं बाहेर :दरम्यान, यष्टीरक्षक जॉर्डन कॉक्स दुखापतीमुळं पदार्पण करु शकणार नाही. क्वीन्सटाउनमध्ये नेट सेशनदरम्यान त्याचा अंगठा तुटला. यामुळं त्याला मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. कॉक्स याआधी रजेवर असलेला नियमित यष्टीरक्षक फलंदाज जेमी स्मिथच्या जागी आला होता. आता पोप विकेटकीपिंग करताना दिसणार आहे.