मेलबर्न Nitish Kumar Reddy Inspirational Story : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (28 डिसेंबर) भारताचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीनं अप्रतिम खेळ दाखवला. नितीशनं भारतीय संघाच्या पहिल्या डावात शतक झळकावलं. नितीशनं 171 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने 10 चौकारांशिवाय एक षटकारही मारला. नितीशच्या छोट्या कसोटी कारकिर्दीतील हे पहिलं शतक आहे.
वॉशिंग्टनसोबत सुंदर भागीदारी : नितीशकुमार रेड्डी क्रीझवर आला तेव्हा भारताची धावसंख्या सहा विकेट्सवर 191 धावा होती आणि फॉलोऑनचा धोका होता. पण नितीशच्या धाडसी खेळीनं भारताला संकटातून सोडवलं. यादरम्यान उजव्या हाताचा फलंदाज नितीश आणि वॉशिंग्टन सुंदरनं आठव्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळं फॉलोऑन वाचवण्यात रोहित ब्रिगेडला यश आलं.
टीकाकारांना खेळीनं प्रत्युत्तर : नितीश कुमार रेड्डीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाल्यावर त्या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, पर्थ कसोटीत पदार्पणातच नितीशनं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. नितीशने पर्थ कसोटीत 41 आणि 38* धावा केल्या होत्या. यानंतर त्यानं ॲडलेड कसोटीतही दोन्ही डावात 42-42 धावा केल्या. गब्बा टेस्टमध्ये नितीशच्या बॅटमधून 16 धावा आल्या, त्या खूप मोलाच्या होत्या. तेव्हा नितीशनं रवींद्र जडेजासोबत सातव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी करुन भारताला फॉलोऑन वाचवण्यास मदत केली.
मात्र, पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करुनही नितीशकुमार रेड्डीला मेलबर्न कसोटीसाठी वगळलं जाऊ शकतं, अशी चर्चा होती. पण भारतीय संघ व्यवस्थापनाचा या युवा खेळाडूवर विश्वास कायम होता. आता 21 वर्षीय नितीशनं मेलबर्न कसोटीत चमकदार कामगिरी करुन चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे.
वडिलांनी सोडली नोकरी : नितीश कुमार रेड्डीचा क्रिकेट प्रवास सोपा नव्हता. नितीश सामान्य पार्श्वभूमीतून आला आहे. त्याच्या वडिलांनी त्याच्या करिअरसाठी नोकरी सोडली. त्यांनी नितीशचं मार्गदर्शन व पालनपोषण केले. वडिलांच्या मेहनतीचंच फळ आहे की नितीश आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार म्हणून उदयास आला आहे. नितीशनं एका मुलाखतीत असंही म्हटलं होतं की, त्याचे वडील हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला की तो एक चांगला क्रिकेटर बनू शकतो.
हार्दिकच्या भेटीनं बदललं करियर : नितीश कुमार रेड्डीचे वडील मुत्याला यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मुलाबाबत मोठा खुलासा केला होता. भारताचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू हार्दिकला नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये भेटल्यानंतर नितीशची कारकीर्द बदलली, असं ते म्हणाले होते. मुत्याला म्हणाले, 'एनसीएमध्ये त्याच्या U19 दिवसांच्या काळात त्याला हार्दिक पांड्याशी बोलण्याची संधी मिळाली. तेव्हापासून त्याला फक्त अष्टपैलू बनायचं होतं.
कमी वयात केले अनेक विक्रम : 26 मे 2003 रोजी जन्मलेला नितीश कुमार रेड्डी हा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा सुरुवातीपासूनच मोठा चाहता आहे. त्यानं आपल्या वयोगटात आंध्र प्रदेशच्या टॉप ऑर्डरवर वर्चस्व राखलं आहे. 2017-18 च्या मोसमात नितीशनं विजय मर्चंट ट्रॉफीच्या रेकॉर्ड बुकमध्ये आपलं नाव समाविष्ट केलं होतं. वास्तविक, नितीशनं 176.41 च्या प्रचंड सरासरीनं 1,237 धावा केल्या होत्या, ज्या या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावा आहेत. यादरम्यान त्यानं नागालँडविरुद्ध 366 चेंडूत त्रिशतक, दोन शतकं, दोन अर्धशतकं आणि 441 धावा केल्या. 2018 च्या वार्षिक पुरस्कार समारंभात BCCI द्वारे '16 वर्षाखालील श्रेणीतील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू' म्हणून निवडलं गेलं तेव्हा नितीश त्याच्या फलंदाजीचा आदर्श विराटला भेटला.
पदार्पणाच्या T20I मालिकेत दमदार कामगिरी :देशांतर्गत क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील उत्कृष्ट कामगिरीनंतर नितीश कुमार रेड्डीची भारतीय क्रिकेट संघात निवड करण्यात आली. नितीशनं या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. ग्वाल्हेरमध्ये झालेल्या त्या सामन्यात नितीश 16 धावांवर नाबाद राहिला. त्यानंतर नितीशनं आपल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 74 धावांची खेळी केली.
गोलंदाजीतही दमदार कामगिरी : नितीश कुमार रेड्डी केवळ फलंदाजीत चमत्कार करत नाही, तर गोलंदाजीतही तो कहर करतो. नितीशनं रणजी ट्रॉफीदरम्यान मुंबईविरुद्धच्या दुसऱ्या प्रथम श्रेणी सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या. नितीशनं बांगलादेशविरुद्धच्या पदार्पणाच्या T20 मालिकेतही तीन विकेट घेतल्या होत्या. एवढंच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चालू कसोटी मालिकेतही नितीशनं आतापर्यंत तीन विकेट्स घेतल्या आहेत.
नितीश कुमार रेड्डीची कारकिर्द :
- 27 प्रथम श्रेणी सामने, 1063 धावा, 59 विकेट
- 22 लिस्ट-ए सामने 403 धावा, 36.63 सरासरी, 14 विकेट
- 23 T20 सामने 485 धावा, 6 विकेट्स
- 3 आंतरराष्ट्रीय T20 सामने 90 धावा, 3 विकेट्स
- 4 कसोटी सामने 284* धावा, 3 विकेट
हेही वाचा :
- 'स्टुपिड, स्टुपिड, स्टुपिड...' ऋषभ पंत बाद होताच सुनील गावस्कर संतापले; पाहा व्हिडिओ
- नितीश कुमारचं 'रेकॉर्ड ब्रेक' शतक... बाहुबली आणि पुष्पा स्टाईलनं केलं सेलिब्रेशन