श्रीनगर Legends League Cricket 2024 Live Streaming : काश्मीरमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट परतणार आहे. यामध्ये शिखर धवन, इरफान पठाण, सुरेश रैना तसंच इयान बेल आणि दिनेश कार्तिकसह अनेक दिग्गज खेळताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे काश्मीरमध्ये 38 वर्षांनंतर क्रिकेट सामना होणार आहे, यात चाहत्यांना दिग्गज खेळाडू स्टेडियममध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत.
या लीगचा तिसरा हंगाम : वास्तविक, आजपासून (20 सप्टेंबर) काश्मीरमध्ये लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) सुरु होत आहे. या लीगचा हा तिसरा हंगाम असेल. गेल्या मोसमात हरभजन सिंगच्या मणिपाल टायगर्सनं सुरेश रैनाच्या अर्बनरायझर्स हैदराबादचा पराभव करुन विजेतेपद पटकावलं होतं. यावेळी या स्पर्धेत एकूण 25 सामने खेळवले जाणार असून त्यातील अंतिम सामना 16 ऑक्टोबर रोजी श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर होणार आहे.
1986 मध्ये झाला होता भारत-ऑस्ट्रेलिया वनडे : याआधी 38 वर्षांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शेवटचा वनडे सामना काश्मीरमध्ये खेळला गेला होता. त्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना झाला नाही. आता लिजेंड क्रिकेट लीगच्या माध्यमातून काश्मीरमध्ये क्रिकेटचं वातावरण निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. राज्यासाठीही हा चांगला उपक्रम आहे. या दरम्यान देशांतर्गत स्पर्धांचं सामने झाले असले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंबाबत कोणतीही लीग किंवा स्पर्धा झालेली नाही.
काश्मीरमध्ये 2 सामने, दोन्हीमध्ये भारतीय संघाचा पराभव : काश्मीरमध्ये आतापर्यंत फक्त 2 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. हे दोन्ही एकदिवसीय सामने होते, जे श्रीनगरमध्ये झाले. पहिला सामना 13 ऑक्टोबर 1983 रोजी झाला होता, ज्यात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना झाला होता. वेस्ट इंडिजनं हा सामना 28 धावांनी जिंकला होता. यानंतर 1986 मध्ये झालेल्या सामन्यातही भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. अशा प्रकारे भारतीय संघ काश्मीरमध्ये एकही सामना जिंकू शकला नाही.