नवी दिल्ली KKR Captain in IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या आधी एक मेगा लिलाव होणार आहे. या मेगा लिलावापूर्वी सर्व संघात मोठे बदल होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच संघ यासाठी लढण्यात व्यस्त आहेत. आता कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) मोठा डाव खेळून मुंबईच्या एका स्टार खेळाडूला आपल्या संघात समाविष्ट करण्याचा विचार करत आहे.
सूर्यकुमार यादवला कर्णधार बनविण्याची शक्यता : शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सला मुंबईच्या रोहित शर्माचा नव्हे तर सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करायचा आहे. एका पत्रकाराच्या वृत्तानुसार, केकेआरनं सूर्यकुमार यादवला कर्णधारपदाची ऑफर दिली आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना ते म्हणाले की, सूर्यकुमार यादव देखील यासाठी तयार आहेत. याशिवाय 2024 मध्ये केकेआरला चॅम्पियन बनवणारा श्रेयस अय्यर केकेआरमधून बाद होऊ शकतो. मात्र, या प्रकरणी केकेआरकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सूर्यकुमार यादव मुंबईतून निघून गेल्यानं फ्रँचायझीमध्ये पुन्हा एकदा गोंधळ सुरु होऊ शकतो. याआधी मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून खरेदी केले होते. यासोबतच त्यांनी पांड्याला कर्णधारही बनवलं होतं.