मुंबई Jemimah Rodrigues : क्रिकेटविश्वातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. T20 महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. परिणामी त्यांना उपांत्य फेरी देखील गाठता आली नाही. ही घटना ताजी असतानाच आता महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जला मुंबईतील खार जिमखाना क्लबनं तीन वर्षासाठी सदस्यत्व बहाल केलं होतं. मात्र जेमिमा रॉड्रिग्जच्या वडील इव्हान यांनी खार जिमखान्याचा वापर धार्मिक कार्यक्रमासाठी केला असून, तिच्या वडिलांनी धर्मांतर संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचा ठपका खार जिमखाना क्लबनं ठेवत क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचं सदस्यत्व रद्द केलं आहे.
वडीलांवर कशाचे आरोप : दरम्यान, मिळाल्या माहितीनुसार खार जिमखाना क्लबमध्ये क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचे हिचे वडील इव्हन यांनी जिमखाना परिसरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करायचे. या कार्यक्रमातून ते अन्य धर्मातील लोकांचं धर्मांतर करुन घ्यायचे, उपेक्षित समाजातील लोकांना धर्मांतर करुन घेत असल्याची बाब खार जिमखान क्लबच्या लक्षात आली. आपण एकीकडे देशात धर्मांतराला विरोध करत असताना, दुसरीकडे महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचे वडील इव्हन हे आपल्या जिमखान्यातच धर्मांतर करत असल्याचं निदर्शनास आल्यामुळं क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचं क्लबचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे, असं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, "रविवारी 20 ऑक्टोबर रोजी खार जिमखाना क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत हा विषय घेण्यात आला. जेमिमा रॉड्रिग्जच्या वडीलांनी क्लबचा गैरप्रकारे धर्मांतरासाठी वापर केल्यामुळं जेमिमा रॉड्रिग्जचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला", अशी माहिती खार जिमखान्याचे अध्यक्ष विवेक देवनानी यांनी दिली आहे. दरम्यान, जेमिमाचे वडील हे 'ब्रदर मॅन्युएल मिनिस्ट्रीज' नावाच्या संस्थेशी संबंधित होते. या संस्थेच्या माध्यमातून ते धर्मांतर करत होते, असंही क्लबनं म्हटलं आहे.