वेलिंग्टन Most Fifties in Test Cricket :इंग्लंड आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुटनं शानदार अर्धशतक झळकावलं. इंग्लंडकडून याच डावात बेन डकेट आणि जेकब बेथॉल यांनीही 92 आणि 96 धावांची शानदार खेळी खेळली. मात्र जो रुटनं खेळलेल्या खेळीनं भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा विक्रम मोडीत काढला आहे.
इंग्लंडकडे भक्कम आघाडी : वेलिंग्टन इथं खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडनं सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लिश संघानं दुसऱ्या डावात 5 गडी गमावून 378 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडकडं 533 धावांची महाकाय आघाडी आहे.
कसोटीत ठोकली 100 अर्धशतकं :खरं तर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात जो रुटनं अर्धशतक झळकावलं तेव्हा त्यानं कसोटीत 100 अर्धशतकांचा टप्पा गाठला होता. अशा प्रकारे तो राहुल द्रविडच्या पुढं गेला. कारण राहुल द्रविडच्या नावावर कसोटीत 99 अर्धशतकं आहेत. मात्र आता जो रुटनं 100 अर्धशतकं पूर्ण केली आहेत. म्हणजे तो त्याच्याही पुढं गेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकणाऱ्यांच्या यादीत जो रुट आता चौथ्या क्रमांकावर आहे. तर अशी कामगिरी करणारा जो रुट इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.