क्राइस्टचर्च Joe Root Out on Duck :न्यूझीलंड आणि इंग्लंड क्रिकेट संघात कसोटी मालिका सुरु झाली आहे. 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 28 नोव्हेंबरपासून हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च इथं खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडनं यजमान किवी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. यानंतर न्यूझीलंडनं पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडनं 8 गडी गमावून 319 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात किवी संघ 348 धावांवर बाद झाला. याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. इंग्लिश संघानं अवघ्या 45 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या.
रुटच्या नावावर लज्जास्पद विक्रम : सलामीवीर जॅक कॉली आपले खातंही उघडू शकला नाही आणि चौथ्या षटकात मॅट हेन्रीचा बळी ठरला. तर पदार्पण करणारा अष्टपैलू जेकब बेथेल त्याच्या पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. बेथेलनं केवळ 10 धावा केल्या. यानंतर नंबर-1 कसोटी फलंदाज जो रुट फलंदाजीसाठी मैदानात आला पण खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. रुटला त्याच्या 150 व्या कसोटी सामन्यात मोठी खेळी खेळण्याची उत्तम संधी होती पण तो केवळ चार चेंडूंचा सामना करु शकला आणि नॅथन स्मिथच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. अशाप्रकारे जो रुटच्या नावावर लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला.
याआधी दोन खेळाडूंच्या नावावर हा लज्जास्पद विक्रम : वास्तविक, जो रुट आपल्या 150व्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोन फलंदाजांसोबत असं घडलं होतं आणि ते दोघंही ऑस्ट्रेलियाचे होते. रुटच्या आधी, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ आणि रिकी पाँटिंग आपापल्या 150 व्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. स्टीव्ह वॉनं 2002 मध्ये हा वाईट विक्रम केला होता तर 2010 मध्ये पाँटिंगसोबत असं घडलं होतं.