हैदराबाद IPL 2024 SRH vs PBKS : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामातील 69व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) नं पंजाब किंग्स (PBKS) चा 4 विकेट्सनं पराभव केलाय. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी झालेल्या या सामन्यात पंजाबनं यजमान संघाला विजयासाठी 215 धावांचं लक्ष्य दिलं होतं. जे त्यांनी अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पूर्ण केलं. त्यांच्या शेवटच्या साखळीतील विजयासह सनरायझर्स हैदराबादनं गुणतालिकेत दुसरं स्थान गाठलंय. आता राजस्थान रॉयल्सनं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना गमावला किंवा हा सामना अनिर्णित राहिला, तर सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर कायम राहील, अशा स्थितीत सनरायझर्स क्वालिफायर-1 सामन्यात प्रवेश करेल.
अभिषेकचं आक्रमक अर्धशतक : सनरायझर्स हैदराबादच्या विजयात अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अभिषेक शर्मानं 28 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं 66 धावांची तुफानी खेळी केली. तर हेनरिक क्लासेननं 26 चेंडूंचा सामना करत 3 चौकार आणि दोन षटकारांसह 42 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादसाठी राहुल त्रिपाठी (33) आणि नितीश रेड्डी (37) यांनीही उपयुक्त योगदान दिलं. पंजाब किंग्सचा चालू मोसमातील हा नववा पराभव असून गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर आहेत.
पंजाबचीही आक्रमक फलंदाजी : तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सनं 5 गडी गमावत 214 धावा केल्या. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगनं सर्वाधिक 71 धावा केल्या. प्रभासिमरननं 45 चेंडूंचा सामना केला आणि सात चौकारांव्यतिरिक्त चार षटकार ठोकले. तर विदर्भाच्या अथर्व तायडेनं 27 चेंडूंत 5 चौकार आणि दोन षटकारांसह 46 धावांची तुफानी खेळी केली. अथर्व आणि प्रभासिमरन यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करुन मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यानंतर राईली रुसोनं 49 (24 चेंडू, 3 चौकार आणि 2 षटकार) आणि कर्णधार जितेश शर्मानं नाबाद 32 धावांचं (15 चेंडू, 2 चौकार आणि 2 षटकार) योगदान दिलं.