IPL 2024 Awards List :इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या 17 व्या हंगामाचा अंतिम सामना 26 मे (रविवार) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 8 गडी राखून पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनला आहे. तर सनरायझर्स हैदराबादचं दुसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावण्याचं स्वप्न भंगलं.
विराट कोहलीनं रचला इतिहास :आयपीएलच्या या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं वर्चस्व गाजवलं. त्यानं संपूर्ण मोसमात शानदार फलंदाजी करत सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकली. 35 वर्षीय विराट कोहलीनं आयपीएल 2024 मध्ये 15 सामन्यांमध्ये 61.75 च्या सरासरीनं आणि 154.69 च्या स्ट्राइक रेटनं 741 धावा केल्या. या काळात किंग कोहलीनं एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली. विराटनं दुसऱ्यांदा ऑरेंज कॅपवर कब्जा केलाय. आयपीएलमध्ये दोनदा ऑरेंज कॅप जिंकणारा कोहली हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कोहलीनं 2016 च्या मोसमात 973 धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती.
प्लेयर ऑफ द टुर्नामेंट :कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू सुनील नरेनला प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा किताब मिळालाय. आयपीएलमध्ये तीनवेळा हा पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरलाय. नरेननं 488 धावा केल्या आणि 17 विकेट घेतल्या. नरेननं 9.27 च्या इकॉनॉमी आणि 31.44 च्या सरासरीनं 17 विकेट घेतल्या. 15 सामन्यात 180.74 च्या स्ट्राईक रेटनं 488 धावा केल्या.
IPL 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
• विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा) – 741 धावा
• ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्ज) – 583 धावा
• रियान पराग (राजस्थान रॉयल्स) – 573 धावा
हर्षल पटेलनं दुसऱ्यांदा जिंकली पर्पल कॅप : वेगवान गोलंदाज हर्षल पटेलबद्दल बोलायचे तर त्यानं या मोसमात 14 सामन्यात 19.87 च्या सरासरीनं आणि 9.73 च्या इकॉनॉमी रेटनं 24 विकेट घेतल्या. हर्षल पटेलनं दुसऱ्यांदा पर्पल कॅपवर कब्जा केलाय. याआधी हर्षलनं 2021 च्या मोसमात पर्पल कॅप जिंकली होती.