दुबई International League T20 2024 : संयुक्त अरब अमिरात (युएई) झालेल्या आंतरराष्ट्रीय लीग टी20 2024 चं विजेतेपद MI Emirates (मुंबई इंडियन्स इमिराट्स) संघानं पटकावलंय. मुंबई संघानं अंतिम फेरीत दुबई कॅपिटल्सचा 45 धावांनी पराभव केलाय. यामुळं आगामी आयपीएलसाठी मुंबईनं आपण तयार असल्याचं दाखवून दिलंय.
प्रथम फलंदाजीत मुंबईनं उभारला धावांचा डोंगर : दुबई इथं झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं 20 षटकांत 3 बाद 208 धावा केल्या. संघासाठी कर्णधार निकोलस पुरननं 27 चेंडूतच 2 चौकार आणि 6 षटकारांचा तडाखा देत 57 धावांची सर्वात मोठी खेळी केली. याशिवाय आंद्रे फ्लेचरनंही 53 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना दुबई कॅपिटल्स संघाला 20 षटकांत 7 बाद 163 धावाच करता आल्या. दुबईसाठी कर्णधार सॅम बिलिंग्जनं 29 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 40 धावांची सर्वात मोठी खेळी केली. मात्र त्याची ही खेळी संघाला विजयी बनविण्यासाठी पुरेशी नव्हती. गोलंदाजीत मुंबईकडून विजयकांत आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
दुबई कॅपिटल्स सुरुवातीपासून कमजोर : मुंबईनं दिलेल्या 209 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दुबई कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांनी डावाच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर लुईस डू प्लॉय (00) च्या रुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर टॉम एबेल आणि टॉम बँटन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी करत डान सावरला. मात्र पाचव्या षटकात टॉम एबेल बाद झाल्यानं ही भागीदारी संपुष्टात आली. यानंतर 8व्या षटकात टॉम बँटनही पॅव्हेलियनमध्ये परतला. उत्तम खेळी खेळणारा बँटन 20 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 35 धावा करुन बाद झाला. त्यानंतर कर्णधार सॅम बिलिंग्ज आणि सिकंदर रझा यांनी काही वेळ डाव सांभाळला त्यांनी 38 धावांची भागीदारी केली. दोघांची ही भागीदारी 13व्या षटकात सिकंदर रझाच्या विकेटनं संपली. त्यानंतर 14व्या षटकात कर्णधार सॅम बिलिंग्जही पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर 17व्या षटकात रोव्हमन पॉवेल केवळ 8 धावा करुन बाद झाला. तर 19व्या षटकात जेसन होल्डर ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. होल्डरनं 16 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार लगावत 24 धावा केल्या.
गोलंदाजीत मुंबईची कमाल : मुंबईच्या संघानं प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. त्यांच्याकडून विजयकांत आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. याशिवाय अकील हुसेन, मोहम्मद रोहीद खान आणि वकार सलामखिल यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.
- हेही वाचा :
IND vs ENG 3rd Test : बेन डकेटनं केलं यशस्वी जैस्वालचं कौतुक, म्हणाला, "हा उगवता तारा" - पंचांनी आऊट दिल्यानंतर 20 मिनिटांनी अजिंक्य रहाणे पुन्हा आला फलंदाजीला; आसाम-मुंबई रणजी सामन्यात नेमकं काय घडलं?