नवी दिल्ली T20 Cricket : बुधवार म्हणजेच 9 ऑक्टोबरचा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी धमाकेदार ठरणार आहे. कारण या दिवशी चाहत्यांना क्रिकेट सामन्यांचा बडल डोस मिळणार आहे, कारण भारतीय संघ एकाच वेळी दोन सामने खेळणार आहे. यात एकीकडे भारतीय महिला क्रिकेट संघ ICC महिला T20 विश्वचषक 2024 च्या आपल्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळताना दिसणार आहे. तर दुसरीकडे, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष क्रिकेट संघ बांगलादेशसोबत भिडताना दिसणार आहे.
भारतीय महिलांसाठी 'करो या मरो'चा सामना : ICC महिला T20 विश्वचषक 2024 च्या बाराव्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ बुधवारी श्रीलंका महिला क्रिकेट संघाविरुद्ध सामना खेळताना दिसणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खेळवला जाईल. युएईत सुरु असलेल्या ICC महिला T20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा हा तिसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला 58 धावांनी पराभूत केलं होतं, त्यानंतर रविवारी झालेल्या आपल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 6 विकेटनं धुळ चारत स्पर्धेतील आपलं आव्हान जिवंत राखलं. आता या तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाला कोणत्याही किंमतीत विजयाची गरज आहे.