India vs Zimbabwe 1st T20 :भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. आजपासून या मालिकेला सुरुवात होणार असून भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हरारे स्पोर्ट्स क्लब इथं हा सामना रंगणार आहे. भारताचा युवा संघ या दौऱ्यासाठी पाठवण्यात आला आहे. शुभमन गिलकडं भारतीय संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. गिल पहिल्यांदाच टीम इंडियाची कमान सांभाळताना दिसणार आहे. तर झिम्बाब्वे संघाचं नेतृत्व सिकंदर राजा करणार आहे. टी-20 च्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. टी-20 विश्वचषक पटकवल्यानंतर प्रथमच भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध खेळण्यास उतरणार आहे.
कोणाचं पारंड जड :टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि झिम्बाब्वेचे संघ आतापर्यंत 8 वेळा आमनेसामने आले आहेत. या काळात झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाचा वरचष्मा राहिला आहे. भारतानं आतापर्यंत विरोधी संघाविरुद्ध 6 सामन्यात यश मिळवलं आहे. तर विरोधी संघानं फक्त 2 सामने जिंकले आहेत. मात्र गेल्या 5 टी-20 झिम्बाब्वेनं भारताला कडवी टक्कर दिली आहे. झिम्बाब्वेनं भारताला दोनदा पराभूत केलं आहे, तर भारतीय संघानं तीन वेळा विजय मिळवला आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेचे वेळापत्रक
- पहिला सामना- 6 जुलै
- दुसरा सामना- 7 जुलै
- तिसरा सामना- 10 जुलै
- चौथा सामना- 13 जुलै
- पाचवा सामना- 14 जुलै