हैदराबाद IND vs ENG Test Match : भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून (25 जानेवारी) सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद इथं सुरू आहे. या मालिकेत भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. गेल्या 12 वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं मायदेशात एकहाती वर्चस्व राहिलंय. आक्रमकतेची (बॅझबॉल) नवी व्याख्या तयार करणारा इंग्लंडचा संघ पहिल्या कसोटीत रोहित शर्माच्या संघाशी भिडत आहे.
- पहिल्या दिवसाचा खेळ संपलाय. यात इंग्लंडनं 127 धावांची आघाडी घेतली असून, भारतानं 119 धावा करत 1 विकेट गमावली आहे.
- इंग्लंडचा पहिला डाव 246 धावातच आटोपलाय.
- या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतीय संघ 3 फिरकीपटुंसह मैदानात उतरलाय.
11 वर्षांपासून भारतीय भूमीवर इंग्लंडला मालिका विजयाची प्रतीक्षा : इंग्लंड संघानं भारतीय भूमीवर कसोटी मालिकेतील शेवटचा विजय 2012-13 मध्ये मिळवला होता. म्हणजे गेल्या 11 वर्षांपासून इंग्लिश संघ भारतात एकही द्विपक्षीय कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. यावेळी बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ बेझबॉल खेळाच्या जोरावर मालिका जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तोच भारतीय संघ मायदेशातील आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
हेड टू हेड रेकॉर्ड काय : इंग्लंड आणि भारत यांच्यात आतापर्यंत एकूण 131 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारतीय संघानं 31 सामने जिंकले तर 50 सामन्यांमध्ये इंग्लंडला विजय मिळालाय. तर दोन्ही संघांमध्ये 50 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये एकूण 64 कसोटी सामने खेळले गेले. त्यापैकी इंग्लंडनं केवळ 14 सामने जिंकले. तर भारतानं 22 कसोटी सामने जिंकले आहेत. 28 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 35 द्विपक्षीय कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. यात भारतानं 11 मालिका जिंकल्या, तर 19 मालिका गमावल्या आहेत. 5 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.