सेंट लुसिया IND vs AUS T20 World Cup : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी 20 विश्वचषकाच्या सुपर-8 फेरीत भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात सामना सुरू आहे. हा सामना ग्रोस आयलेट येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलंय. यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या विक्रमी खेळीच्या बळावर भारतानं निर्धारित 20 षटकात 205 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानं 2 गडी गमावून 90 हून अधिक धावा केल्या आहेत.
रोहितनं 19 चेंडूत ठोकलं अर्धशतक, आठ धावांनी हुकलं शतक : या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 5 गडी गमावून 205 धावा केल्या. संघाची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांनी विराट कोहलीच्या (0) रुपानं पहिली विकेट 6 धावांवर गमावली. यानंतर कर्णधार रोहित शर्मासह ऋषभ पंतनं 38 चेंडूत 87 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत नेलं. यासह रोहितनं 19 चेंडूत अर्धशतक केलं. जरी तो आपलं शतक पूर्ण करु शकला नाही, तरी रोहितनं या सामन्यात 41 चेंडूत 92 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान रोहितनं 8 षटकार आणि 7 चौकार लगावले. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादवनं 31, शिवम दुबेनं 28, हार्दिक पांड्यानं नाबाद 27 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉइनिस आणि मिचेल स्टार्कनं 2-2 विकेट घेतल्या. तर जोश हेझलवूडला 1 विकेट मिळाली.
भारताचं उपांत्य फेरीतीस स्थान पक्कं : या विश्वचषकाच्या सुपर-8 च्या ग्रुप 2 मधून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आधीच सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. तर गट 1 अजूनही पूर्णपणे खुला आहे. गट 1 मध्ये भारतीय संघ 4 गुणांसह आणि +2.425 च्या उत्कृष्ट धावगतीनं अव्वल स्थानावर आहे. त्यांचं उपांत्य फेरीतील आपलं स्थान जवळपास पक्कं केलं आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारलेला ऑस्ट्रेलिया संघ आहे. या परिस्थितीत कांगारु संघाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहायचं असेल, तर त्यांना हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल. जर हा सामना पावसानं वाहून गेला तर तो पूर्णपणे रद्द करावा लागेल, कारण सुपर-8 सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.
कांगारुंसाठी सामना जिंकणं अनिवार्य : हा सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना 1-1 गुण मिळेल. अशा परिस्थितीत भारतीय संघ आपल्या गट 1 मध्ये 5 गुणांसह अव्वल स्थानावर असेल आणि उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित करेल. पण एका गुणानं ऑस्ट्रेलिया अडचणीत येऊ शकतं कारण असं झाल्यास त्यांचे एकूण गुण 3 होतील. परिणामी त्यांना अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. अफगाणिस्तानचा संघ हा सामना जिंकल्यास 4 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करेल. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वचषकातून बाहेर जाईल. मात्र जर त्या सामन्यात बांगलादेश संघानं अफगाणिस्तानला पराभूत केलं तर दोन्ही संघ बाद होतील. त्या स्थितीत ऑस्ट्रेलियन संघ 3 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करेल. तर अफगाण संघ 2 गुणांसह बाद होईल.