इंदौर Hardik Pandya Explosive Half-Century : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये बडोदा आणि तामिळनाडू संघांमधील रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात दोन्ही संघांनी 200 हून अधिक धावा केल्या आणि सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर संघाचा विजय झाला. बडोदा संघाकडून खेळणाऱ्या हार्दिक पांड्यानं या सामन्यात तुफानी खेळी केली. यादरम्यान त्यानं मैदानात चौकार आणि षटकार मारले. हार्दिक पांड्यानं नुकतंच चेन्नई सुपर किंग्ज संघानं विकत घेतलेला वेगवान गोलंदाज गुर्जपनीत सिंगविरुद्धही चमकदार कामगिरी केली.
बडोदा आणि तामिळनाडू यांच्यात रोमांचक सामना :दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात बडोदा संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूनं प्रथम फलंदाजी करत दमदार खेळ करत 20 षटकांत 6 गडी गमावून 221 धावा केल्या. प्रत्युत्तरात बडोदा संघानं सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारुन 222 धावांचं लक्ष्य गाठलं आणि विजय मिळवला. बडोद्याच्या विजयाचा हिरो ठरला हार्दिक पांड्या. पांड्यानं 30 चेंडूत 230 च्या स्ट्राईक रेटनं 69 धावा केल्या, ज्यात 4 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.
एकाच षटकात ठोकल्या 29 धावा : बडोद्याच्या डावाच्या 17व्या षटकात हार्दिक पांड्यानं CSKचा नवा गोलंदाज गुरजपनीत सिंगचाही सामना केला. गुरजपनीत सिंगच्या षटकातील पहिल्या 3 चेंडूंवर पांड्यानं 3 षटकार ठोकले. यानंतर गुरजपनीत सिंगनं नो बॉल टाकला. त्यानंतर पांड्यानं चौथ्या चेंडूवर षटकार आणि पाचव्या चेंडूवर चौकार ठोकला. त्याचवेळी ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर 1 धाव झाली. हार्दिक पांड्यानं गुरजपनीत सिंगच्या षटकात एकूण 29 धावा केल्या आणि 1 धाव देखील नो बॉलमधून आली, म्हणजे गुरजपनीतनं या षटकांत एकूण 30 धावा केल्या.
कोण आहे गुरजपनीत सिंग? : 26 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज गुरजपनीत सिंग आयपीएल लिलावादरम्यान चर्चेत आला. गुरजपनीत सिंग देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळतो. 6 फूट 3 इंच उंच गुरजपनीत आयपीएल लिलावात 30 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह आला होता. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स संघांनी त्याला विकत घेण्यासाठी जोरदार बोली लावली, शेवटी CSK नं त्याला 2.20 कोटी रुपयांना त्यांच्या संघाचा भाग बनवलं.
हेही वाचा :
- 7 चेंडूत 4 विकेट, 32 धावांत संघ ऑलआउट; T20 सामन्यात 102 चेंडू शिल्लक ठेवून विक्रमी विजय
- भारताविरुद्धच्या मालिकेत संघाबाहेर; आता पहिल्याच सामन्यात मोठी खेळी करत केलं दमदार पुनरागमन