इंदौर Hardik Pandya Explosive Batting :भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. तो फलंदाजीमध्ये एकामागून एक स्फोटक खेळी करत आहे. बडोदा संघाकडून खेळणारा हार्दिक पांड्या या स्पर्धेत गोलंदाजांसाठी आपत्तीजनक ठरला आहे. त्रिपुराविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही त्यानं मॅचविनिंग इनिंग खेळली होती. या खेळीदरम्यान त्यानं डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज परवेझ सुलतानचा सामना केला आणि एकाच षटकात चौकार आणि षटकार मारले.
हार्दिक पांड्याची पुन्हा वादळी खेळी : त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्यानं 23 चेंडूत 47 धावांची खेळी केली. यावेळी पांड्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 5 षटकार निघाले. यादरम्यान त्यानं फिरकी गोलंदाज परवेझ सुलतानच्या एकाच षटकांत 28 धावा केल्या. बडोद्याच्या डावात परवेझ सुलताननं 10 वं षटक टाकलं, या षटकात पांड्याच्या बॅटमधून 4 षटकार आणि एक चौकार निघाला आणि त्यानं एकूण 28 धावा केल्या.
यापूर्वी केल्या 29 धावा :यापूर्वीही तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्यानं अशीच काहीशी कामगिरी केली होती. हार्दिक पांड्यानं वेगवान गोलंदाज गुरजपनीत सिंगविरुद्ध एका षटकात 29 धावा केल्या होत्या. गुरजपनीत सिंगच्या षटकातील पहिल्या 3 चेंडूंवर पांड्यानं 3 षटकार ठोकले. यानंतर गुरजपनीत सिंगनं नो बॉल टाकला. त्यानंतर पांड्यानं चौथ्या चेंडूवर षटकार आणि पाचव्या चेंडूवर चौकार ठोकला. त्याचवेळी ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर 1 धाव झाली. 26 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज गुर्जपनीत सिंग आयपीएल लिलावादरम्यान प्रसिद्धीझोतात आला, ज्यात CSK नं त्याला 2.20 कोटी रुपयांना विकत घेतलं.
पांड्याच्या जोरावर बडोद्याचा सहज विजय : या सामन्यात त्रिपुरानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 9 गडी गमावून 109 धावा केल्या. प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या बडोदा संघानं केवळ 11.2 षटकांत 115 धावा करुन सामना जिंकला. लक्ष्याचा पाठलाग करताना बडोद्यानं 9 षटकांत 2 गडी गमावून 68 धावा केल्या होत्या. त्याला विजयासाठी पुढील 11 षटकांत 42 धावा करायच्या होत्या. पण पांड्यानं अवघ्या एका षटकात खराब सामना फिरवला आणि संघाला पटकन विजयापर्यंत नेलं.
हेही वाचा :
- T20 क्रिकेटमध्ये घडला इतिहास... 'या' संघाच्या सर्व 11 खेळाडूंनी केली गोलंदाजी
- अव्वल फलंदाजाचा लाजिरवाणा विक्रम; कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त तिसऱ्यांदाच घडलं