किंग्सटन (जमैका) Firing in Live Match : फुटबॉल जगताशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. करेबियन देश जमैकामध्ये एका मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यादरम्यान हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. अनेक वेळा चाहते त्यांच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात आपापसात भांडतात, अशी घटना अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. पण प्लेजंट हाइट्स, रॉकफोर्ट, किंग्स्टन इथं एका फुटबॉल सामन्यादरम्यान अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. यादरम्यान 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात 48 तासांचा संचारबंदी लागू केली आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण क्रिडा विश्व हादरुन गेलं आहे.
लाइव्ह मॅचमध्ये 5 जणांची गोळ्या झाडून हत्या :
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी किंग्स्टनच्या रॉकफोर्टमधील प्लेझंट हाइट्समध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हल्ल्यात पाच जणांचा गोळ्या झाडून मृत्यू झाला. किंग्स्टन इस्टर्नचे पोलिस प्रमुख अधीक्षक टॉमी चेंबर्स यांनी सांगितलं की, गोळीबाराची घटना रात्री 8 वाजता घडली. जमैका कॉन्स्टेब्युलरी फोर्सची माहिती शाखा कॉन्स्टेब्युलरी कम्युनिकेशन्स युनिटनंही या घटनेची पुष्टी केली. त्याचबरोबर या घटनेत किती लोक जखमी झाले आहेत, याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही.